बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि फरहान अख्तर यांना एका ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळाची जाहिरात करणं चांगलंच महागात पडलं आहे. लखनऊमधील वकील रजत बन्सल यांनी मादियाव पोलीस ठाण्यात रणबीर आणि फरहानविरुद्ध जाहिरातीतून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

रजत बन्सल यांनी askmebazar.com या संकेतस्थळावरून २९,९९९ रुपयांचा ४० इंचाचा टेलिव्हजन खरेदी केला होता. मात्र, दहा दिवसांत टेलिव्हिजन घरपोच करण्याचे आश्वासन या संकेतस्थळाने पाळले नाही. उलट, टेलिव्हिजनऐवजी नुसते खरेदी बिल पाठविण्याचा प्रताप या संकेतस्थळाने केल्याचा आरोप रजत बन्सल यांनी केला आहे. फरहान आणि रणबीरसारख्या सेलिब्रेटींच्या भूलथापांना बळी पडून अनेक जण संकेतस्थळावरून वस्तू खरेदी करतात. मात्र कंपनी त्यांनी खरेदी केलेली वस्तू न पाठवता फक्त बिल पाठवून त्यांची फसवणूक करते, असे रजत बन्सल यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

फरहान, रणबीरसह askmebazaar.com या संकेतस्थळाचे संचालक मंडळातील संजीव गुप्ता, आनंद सोनभद्रा, पियुष पंकज, किरण कुमार श्रीनिवास मुर्ती आणि विपणन अधिकारी पुजा गोयल यांच्यावरही फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.