छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दाचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. हे वक्तव्य मुनमुनला आता महागात पडले आहे. मुनमुन विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये मुनमुनने जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ता विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताचे होते ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर प्रेम

यापूर्वी हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस’चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला होता. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुंबईत देखील मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुनमुन दत्ता लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला ** सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत होती. मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.

मुनमुन दत्ताचा माफीनामा

यासंदर्भात मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली होती. ‘हे मी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदर्भात आहे. या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा धमकी देण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाबद्दलचे चुकीचे ज्ञान होते. मला या शब्दाचा अर्थ कळताच मी व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते. समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान आहे याची मी कबुली देते. मी नकळतपणे वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते’ या आशयाची पोस्ट तिने केली होती.