लहान मुलांच्या दृष्टिकोनातून दिसणारे जग अनेकदा भावते. त्यांची समज-विचार यातून दिसणारा जगाचा व्यवहार, चुकतमाकत शिकण्याची प्रक्रिया, कधी भरकटणारी तर कधी एका शब्दाने रुळावर धावणारी गाडी हे आपण अनुभवलेले जग पडद्यावर सुंदर पद्धतीने उमटले तर ते पाहावेसे वाटते, क्षणासाठी का होईना आनंद देऊन जाते. तो आनंद सुनिकेत गांधी दिग्दर्शित ‘फिरकी’ ही तीन शाळकरी मित्रांची कथा पाहतानाही अनुभवायला मिळतो. मात्र गेल्या काही मराठी चित्रपटांमधून लहान मुलांच्या भावविश्वात डोकावून सांगितल्या जाणाऱ्या कथा त्याच त्याच साचेबद्ध, ठरीव पद्धतीने मांडलेल्या पाहायला मिळतात. त्यात चेहरे, दिग्दर्शनाची मांडणी आणि कथावस्तूतला थोडा बदल सोडला तर ग्रामीण पाश्र्वभूमी, मुलांची देहबोली, आईवडिलांचे वागणे या गोष्टी एकाच पद्धतीच्या पाहायला मिळतात. ‘फिरकी’ही त्याला अपवाद ठरत नाही.

गोविंद (पार्थ भालेराव), बंडय़ा (पुष्कर लोणारकर) आणि टिचक्या (अथर्व उपासनी) या तीन शाळकरी मित्रांची ही कथा आहे. ही तिन्ही मुले अभ्यासात सर्वसामान्य आहेत. वागण्यात भली आहेत. त्यांना वेड एकाच गोष्टीचे आहे ते म्हणजे पतंग उडवण्याचे.. त्यांचा हा नादच त्यांना एकत्र घट्ट बांधून ठेवतो. मात्र गावात पतंगबाजीत राघव (अभिषेक भरते) अव्वल आहे. राघवही त्यांच्याच वर्गात शिकतो आहे, मात्र चार मित्र गोळा करायचे आणि दादागिरी करत आपले वर्चस्व राखून ठेवणे हा राघव भाईचा उद्योग आहे. एका प्रसंगात गोविंद राघवची चूक पकडून देतो आणि तेव्हापासून गोविंदला धडा शिकवण्याच्या उद्देशाने राघवचे नवनवे खेळ सुरू होतात. राघवच्या या खेळात या तीन मित्रांचे काय होते?, नाकासमोर सरळ चालणारी ही तिन्ही मुले राघवला शह देतात का?, की त्याच्या खेळात स्वत:च शिकार होतात?, या प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘फिरकी’ची कथा.

आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधायची हा लहान मुलांचा खाक्या असतो. अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या तशा त्यांच्यासाठी असतातच असे नाही. त्यांच्या जगात या छोटय़ा छोटय़ा गोष्टींनीही खूप खळबळ उडते. जशी ती गोविंदच्या आयुष्यात आणि पर्यायाने बंडय़ा-टिचक्या तिघांच्याही भावविश्वात वादळ निर्माण करते. राघवसारख्या मुलांच्या वाटय़ालाही जायचे नाही, ही शिकवण मिळालेली मुले अचानक त्याच्या रूपाने जेव्हा संकट उभे राहते तेव्हा त्याचा सामनाच करू शकत नाहीत. मनात राग आहे पण तो रागही त्यांना संकटावर मार्ग काढण्यासाठी पुरेसा नाही. अशावेळी गोविंदच्या वडिलांचे त्याला समजून घेणे उपयोगी पडते. गोविंदची पतंगबाजीच त्याला या सगळ्यातून बाहेर काढते. ‘फिरकी’ची मांडणी अगदी साधेपणाने दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी केली आहे. त्यांची कथा कोणत्याही मुलाच्या आयुष्यात घडेल इतक्या सहजतेने मांडली असल्याने ती आपली वाटते. विशेषत: मुले आणि आईवडील यांच्यात जो संवाद असायला हवा, त्यावरही हा चित्रपट बोट ठेवतो. मात्र कथेला ग्रामीण भागाची दिलेली पाश्र्वभूमी, कथेत ठरावीक पद्धतीने येणारी वळणे यामुळे ‘फिरकी’च्या आशयाचा पतंग फोर उंच जात नाही. धवल गणबोटे यांचे छायांकन ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे ठरला आहे तो या तिन्ही कलाकारांचा अभिनय. पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर आणि अथर्व उपासनी या तिघांनीही याआधी चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट फार वेगळा नव्हता मात्र चित्रपटाची कथा ही पूर्णपणे या तिघांवरच आहे. हे लक्षात घेता या तिघांनीही सहज अभिनयाने चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. हृषीकेश जोशी आणि अश्विनी गिरी त्यांच्या छोटय़ाशा भूमिकेतही लक्ष वेधून घेतात. मात्र कथेवर आणखी थोडी मेहनत घेतली असती तर त्यातला तोचतोचपणा जाऊन नवा पतंग उडवतानाही मौज अनुभवता आली असती.

  • दिग्दर्शक – सुनिकेत गांधी
  • कलाकार – पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अथर्व उपासनी, हृषीकेश जोशी, अश्विनी गिरी, अभिषेक भरते, ज्योती सुभाष