प्रदीप सरकार,अभिषेक डोगरा ,महेश भट्ट आणि आनंद एल राय या चारही दिग्दर्शिकांच्या चित्रपटांनी एकाच दिवशी शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं. मात्र या चारही चित्रपटांना प्रेक्षकांची मन जिंकण्यास अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे.

एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये ‘फ्राईडे’, ‘हेलीकॉप्टर ईला’, ‘जलेबी’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांचा समावेश आहे. परंतु क्रिटीक्स आणि प्रेक्षकांनी या चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आले.

प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘हेलीकॉप्टर ईला’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री काजोल,रिद्धी सेन आणि नेहा धुपिया यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे.

‘फ्राईडे’ हा कॉमेडी चित्रपट असून अभिषेक डोगरा यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १ ते १.५ कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता गोविंदा आणि वरुण शर्माने स्क्रिन शेअर केली आहे. तर आनंद एल राय यांच्या ‘तुंबाड’ या चित्रपटाने केवळ ६५ लाख रुपयांची रुपयांची कमाई केल्याची माहिती व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘जलेबी’ या रोमॅण्टीक ड्रामा चित्रपटाने पहिल्या दिवशी अत्यंत निम्न कमाई केली असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ०.५ कोटींचा गल्ला जमविला आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्रक्तन’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे.