मराठी कलाविश्वात आजवर अनेक उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आशयघन कथानक, ते सादर करण्याची शैली आणि उत्तम अभिनय करणारे कलाकार यामुळे मराठी कलाविश्वाचा डंका पार सातासमुद्रापार पोहोचला आहे. इतकंच नाही तर या कलाकारांचा, दिग्दर्शक, निर्माते यांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून अनेक वेळा पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. त्यासोबतच अनेक चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून उत्तम दर्जेदार चित्रपटांची दखल घेतली जाते. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच न्यू जर्सी येथे पहिल्या मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पहिल्यांदाच ‘मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१’चं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी मुंबई इंटरनॅशनल फिल्मफेस्टिव्हलच्या (एमआयएफएफ) संचालिका नीता पेडणेकर यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“मराठी संस्कृती, कला, मूल्ये, परंपरा, संगीत यांचे अमेरिकेत जतन करणे हा या मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमॅझॉन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचेही या महोत्सवासाठी सहकार्य लाभणार आहे”, असं नीता पेडणेकर यांनी म्हटलं. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि निर्माते अशोक सुभेदार या महोत्सवाच्या निवड समितीमध्ये असणार आहेत. तर हेमंत पांड्या कार्यकारी संचालक आहेत. मराठीत

गेल्या काही वर्षांपासून काही वेगळे आणि दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. त्यासाठी ‘श्वास’, ‘सैराट’, ‘किल्ला’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘देऊळ’, ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नाळ’ या चित्रपटांचा खास उल्लेख करायला हवा. ‘श्वास’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटांची तर भारताची ऑस्करसाठीची विदेशी चित्रपट विभागात अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र ‘ (१९१३) या चित्रपटाव्दारे निर्मिती सुरु केली आणि मग काळाबरोबर बदलत जात जात मराठी चित्रपटाने चौफेर प्रगती केली आणि प्रतिष्ठा प्राप्त केली. अलिकडच्या काळात मराठीत नागराज मंजुळे (सैराट), चैतन्य ताह्मणे (कोर्ट), अविनाश अरुण (किल्ला) अशा नवीन दृष्टीचे दिग्दर्शक आले.

दरम्यान, न्यू जर्सी येथे होणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवात मोफत प्रवेश घेता येणार असल्याचं महोत्सवाच्या संचालिका नीता पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी filmsfreeway.com येथे प्रवेश घेता येईल. तर अधिक माहितीसाठी http://www.marathiinternationalfilmfestival.org येथे संपर्क साधावा.