‘दंगल’ चित्रपटाच्या यशानंतर चर्चेत असणारा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान काही दिवसांसाठी आपल्या चाहत्यांपासून दूर जाणार आहे. ‘दंगल’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी होणारा कौतुकाचा वर्षाव अद्याप थांबलेला नसताना, आमिरने आपल्या आगामी चित्रपटाची तयारीही सुरु केल्याचे समजते. ‘दंगल’ चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेतल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत आमिरने खूपच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आपला प्रवास अखंडित ठेवण्यासाठी आमिर प्रयत्नशील आहे.

aamir-khan

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हे दोन कलाकार आपल्याला लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. बिग बींसोबतच्या या प्रोजेक्टसाठी आमिर खूपच उत्साहात आहे. पुढच्या दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटात बॉलीवूडचे हे दोन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातील आमिरचा लूक समोर आला आहे. सध्या आमिरला आपल्याला पिळदार मिश्या आणि दाढीत दिसतोय. तर हा लूक त्याने दुस-या तिस-या कोणत्या चित्रपटासाठी नाही तर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटासाठी आहे. पिळदार मिश्या, दाढी आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी बांधलेला आमिरचा पंजाबी लूक यात पाहावयास मिळतोय. या लूकविषयी बोलतना आमिर म्हणाला की, ठग्स…. मधील माझी शरीरयष्टी कुस्तीपटूच्या शरीरयष्टीप्रमाणे म्हणजे भारदस्त आणि भरलेले खांदे असा नसणार. यात माझा सडपातळ बांधा असलेला लूक प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर याच्या कन्फेशन ऑफ अ ठग या पुरस्तकावर आधारित असून याचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.

ठग्स ऑफ हिंदोस्तान व्यतिरीक्त आमिर सिक्रेट सुपरस्टार चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक काही महिन्यांपूर्वीच समोर आला होता. त्यात हा परफेक्शनिस्ट अभिनेता पिळदार मिशा, बाल्बो स्टाईल दाढी लूकमध्ये दिसला होता. पण यात विशेष लक्ष वेधले ते त्याच्या डोक्यावरील मोठमोठ्या क्लिप्सने. ‘मॅड मॅक्स’ या हॉलीवूड सिरीजमध्ये शक्यतो हे पाहावयास मिळते. या चित्रपटाद्वारे आमिरचा माजी व्यवस्थापक अद्वैत चंदन हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. गायक बनण्याची इच्छा असलेल्या लहान मुलावर चित्रपटाची कथा आधारित आहे.

(सौजन्य : पिंकविला)