बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आले. एखाद्या घटनेबद्दल सामान्य प्रेक्षकांना असलेलं कुतूहल, न ऐकलेली बाजू पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे. २००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता जॉन अब्राहम यानं नुकतीच सोशल मीडियाद्वारे माहिती देत ‘बाटला हाऊस’चं पहिलं वहिलं पोस्टर लाँच केलं आहे. ‘प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक सत्य आणि दुसरी असत्य. पण दुसरी बाजू कोणाला दिसलीच नाही तर? ९५ मिनिटांची चकमक आणि ८ वर्षे मेहनत करून कमावलेल्या सर्व गोष्टींवर पाणी फेरलं गेलं. एका क्षणात सारं काही उद्धवस्त झालं ही गोष्ट आहे वादविवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अशाच एक पोलीस अधिकाऱ्याची’ असं म्हणत जॉननं ‘बाटला हाऊस’मधला त्याचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे.

१९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं त्यांची भूमिका जॉन साकारणार आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं याची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासमोर अमिताभ बच्चन, रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चं मोठं आव्हान असणार आहे.