‘रेड बेरी इंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि दयानंद राजन दिग्दर्शित ‘वात्सल्य’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक अंधेरीतील सिनेमॅक्स वर्सोवा येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून नुकताच कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत रिलीज केला गेला. 
‘वात्सल्य’या चित्रपटात वडील आणि मुलगी यांच्या नात्यांची गुंफण केलेली कथा सदर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या ‘वात्सल्य’ या नावावरुनच चित्रपटाचा विषय स्पष्ट होतो. मराठीतला सुपरस्टार भरत जाधव या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.याच्या आधी भरतने गंभीर भूमिका केल्या आहेत, हे खरे असले तरीही या चित्रपटातले त्याच्या भूमिकेचे गांभीर्य त्याहून बरेच वेगळ  आहे.त्याच्या व्यक्तिरेखेला  अनेक कंगोरे आहेत. सततच्या बदलत्या परिस्थितीला तो कसा सामोरा जात राहतो,त्याच्या जीवाची कशी घालमेल होत राहते याचे दर्शन या फर्स्ट लूकमध्ये घडते.
ही कथा एकाअर्थी डॉ.सागर याची आहे. मुंबईतल्या चांगल्या डॉक्टरांमधला एक म्हणून सागर ओळखला जात असतो.अधिक शिक्षण घेण्याचे ठरवून तो परदेशी म्हणजे लंडनला जातो. मग तिथचंसीमा नावाच्या एक आधुनिक विचारांच्या  महाराष्ट्रीय मुलीशी लग्न  करून तिला तो भारतात घेऊन येतो. नव्या विचारांची सीमा आणि भारतीय संस्कृती जपणारी सागरची आई असे परस्परविरुद्ध चित्र निर्माण होते. त्याचे परिणाम घरात जाणवायला लागतात. परिणामी दोघींमध्ये वादही सुरु होतात. आईला समजवायचे की बायकोला अशा द्विधा मन:स्थितीत सागर सापडतो. सीमाही विचार करतच असते. बराच विचार करून एक दिवस सागरला घटस्फोट देऊन सीमा त्याच्या आयुष्यातून निघून जाते. पाहता-पाहता पाच वर्ष लोटतात तरीही सीमाला सागर विसरलेला नसतो. एक दिवस सागरही आपली मुंबईतली सगळी कामं बंद करून एका छोट्याशा गावात जाऊनराहतो आणि तिथेच आईच्या नावाने अनाथआश्रम चालवायला लागतो. याच आश्रमात चिमणी नावाची अनाथ मुलगी असते. अपंग असल्यामुळे ती सर्वांची लाडकी असते. सागरचा तर सगळ्याच मुलांवर खूप जीव असतो. त्यातही खासकरून चिमणीवर. याच्या पुढे काय घडते ते चित्रपटातून समजेल. ‘वात्सल्य’चित्रपटाची कथा आणि पटकथा लखनाची तसेच दिग्दर्शनाची जबाबदारी दयानंद राजन यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात भरत जाधव, रुचिता जाधव, प्रिया गमरे, विजय चव्हाण, दिप-ज्योती नाईक, भाग्यश्री देसाई, प्रशांत विचारे आणि बालकलाकार वैभवी खाडये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.