Sushant-Singh-Rajput
बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत त्याच्या कामामुळे चर्चेत आहे. पीकेमध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणारा सुशांत आता भारतीय कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. अहो, म्हणजे तो काही भारतासाठी क्रिकेट टीममधून खेळणार नाही. तर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारणार आहे. त्याचा हा फर्स्ट लूक सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.
embed-dhoni
या चित्रपटाला यापूर्वीच काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण, या सर्व अडथळ्यांवर मात करत अखेर या चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला हिरवा कंदील देण्यासाठी धोनीकडून प्रचंड मानधनाची अपेक्षा व्यक्त केली जात असल्याची चर्चा होती. तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआय) या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवला होता. ‘अ वेनस्डे’ आणि स्पेशल २६ चित्रपटांचे दिग्दर्शक निरज पांडे यांनी धोनीवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, खेळाडूंच्या जीवनावर साकारलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ चित्रपटांचे यश पाहता या चित्रपटालाही रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण हा सुरेश रैनाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे  सांगण्यात येत आहे.