नाटय़सृष्टीने पुनश्च हरी ओमचा नारा देत तिसरी घंटा वाजवली असली तरी रंगभूमीवर सध्या करोनापूर्वीच्याच नाटकांचे सत्र सुरु आहे. नाटय़गृह पन्नास टक्के  क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर रं गकर्मीनी जोरदार सुरूवात केली. गेल्या वर्षांच्या सुरूवातीलाच दाखल झालेल्या किं वा त्याआधी आलेल्या आणि रंगभूमीवर लोकप्रिय ठरलेल्या जवळपास सगळ्याच नाटकांनी आपले प्रयोग सुरू केले. त्याला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यभरात सगळीकडे नाटकांचे दौरे सुरू झाले आहेत. तरीही अजून नाटकांची आर्थिक घडी सुरळीत झाली नसल्याने नवीन नाटक कधी येईल याबाबत नाटय़सृष्टीत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आता ती भीतीही दूर सारून नव्या प्रयोगांची तयारी सुरू झाली आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी शुक्रवारी आपल्या नव्या नाटकाचा मुहूर्त के ला. १९ मार्चला हे नाटक रंगभूमीवर येणार असून या पाठोपाठ अनेक नव्या नाटकांची नांदी होणार आहे.

शिथिलीकरणानंतर पन्नास टक्के उपस्थितीचा नियम पाळून सुरु झालेली नाटय़सृष्टी अद्यापही आर्थिकदृष्टय़ा स्थिरावली नसल्याचा सूर निर्मात्यांमध्ये आहे. प्रसिद्ध नटांच्या, गाजलेल्या कलाकृती वगळता इतर नाटकांना  तुलनेने कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे निर्मातेही नवीन नाटकांची निर्माती करण्यासाठी धजावताना दिसत नाही. असे असले तरी काही निर्मात्यांनी नवीन नाटक आणण्याची धडपड सुरू के ली आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची निर्मिती असलेले  ‘धनंजय माने इथच राहतात’ हे नाटक रंगभूमीवर दाखल होते आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रिया बेर्डे यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण झाले आहे.

श्रीमंथ आणि व्ही. आर. प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या नाटकाची संहिता नितीन चव्हाण यांनी लिहिली आहे.  राजेश देशपांडे यांनी दिग्दर्शन केले असून अभिनेत्री प्रिया बेर्डे, प्रभाकर मोरे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे हिचेही अभिनेत्री म्हणून हे पहिले नाटक आहे. कौटुंबिक नात्याची किनार असलेल्या या नाटकाचा मूळ गाभा विनोद आणि त्यातून संदेश असा आहे. येत्या १९ मार्च रोजी पुण्यात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होईल तर २८ मार्चपासून मुंबईतले प्रयोग सुरु होईल, अशी माहिती नाटकाचे सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी दिली.

नव्या नाटकांची घोषणा

या पाठोपाठ अभिनेत्री विशाखा सुभेदारही निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अद्याप त्यांच्या नाटकाचे नाव जाहीर झाले नसले तरी येत्या १६ फेब्रुवारीला नाटकाचा मुहूर्त असणार आहे. नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रसाद खांडेकर असून विशाखा सुभेदार यांच्यासह समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आदी कलाकार प्रमुख भूमिकेत असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तर ‘दहा बाय दहा’ नाटकाचे लेखक दिग्दर्शक अनिकेत पाटील यांच्याही आगामी दोन कलाकृती येऊ घातल्या आहेत. अद्वैत थिएटर प्रकाशित, मिलिंद पेडणेकर यांचे लेखन दिग्दर्शन असलेले ‘बाबा आय लव्ह यु’ हे नाटक देखील मार्च अखेर रंगभूमीवर येणार आहे.

करोनाकाळात नवीन नाटक करणे आव्हानात्मक आहे. तरीही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी आपणही नाटक करायला हवे अशी इच्छा होती. संहितेचा शोध सुरूच होता तो या निमित्ताने पूर्ण झाला. हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार याची खात्री आहेच. मात्र मनोरंजन करतानाही यातून एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

– प्रिया बेर्डे, अभिनेत्री— निर्मात्या