गरज ही शोधाची जननी असते, ही उक्ती टाळेबंदीच्या काळात जन्माला आलेल्या ‘नेटक’ या नव्या युगाच्या नव्या नाटक प्रकाराच्या बाबतीत सार्थ ठरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक हृषीके श जोशी यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून आकाराला आलेल्या पहिल्यावहिल्या ‘नेटक’ म्हणजेच इंटरनेटवरील लाइव्ह नाटकाचा आज शुभारंभाचा प्रयोग आहे. ‘मोगरा’ या पहिल्या ‘नेटक’च्या निमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेला लाइव्ह नाटकाचा एक वेगळाच प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र ‘नेटक’ आले तरी नाटक कायम राहणारच, असा विश्वास हृषीकेश जोशी यांनी व्यक्त केला.

टाळेबंदीत घरी बसल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस हे बघ, ते बघ, वाचन कर, असे मनोरंजनाचे सगळे पर्याय चोखाळून झाले. आता पुढे काय? त्या वेळी टाळेबंदी आता थोडय़ा दिवसांत संपेल मग काम सुरू होईल. आता मेमध्ये संपेल आणि काम सुरू होईल.. असा सगळा विचार सुरू होता. मात्र जेव्हा टाळेबंदी जूनपर्यंत पुढे ढकलली गेली तेव्हा लक्षात आले की आता डिसेंबपर्यंत नाटकही सुरू होऊ शकणार नाही आणि चित्रीकरणही सहजी सुरू होणार नाही. त्या वेळी उपलब्ध असलेला प्लॅटफॉर्म हा इंटरनेट किंवा समाजमाध्यमांचा होता. त्याचा कसा प्रभावी वापर करून घेता येईल या विचारातूनच ‘नेटक’चा जन्म झाला.

रंगभूमीवरचे जे नाटक आहे तेही ‘नेटक’ म्हणून लवकरच प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस हृषीकेश जोशी यांनी व्यक्त केला. रंगभूमीवरचे नाटक आणि इंटरनेटवरील ‘नेटक’ या दोन्ही माध्यमांमध्ये फरक असल्याने त्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. टाळेबंदी उठल्यानंतर आणि सगळी परिस्थिती निवळल्यावर जेव्हा नाटय़गृहे सुरू होतील तेव्हा नाटकही पहिल्यासारखेच सुरू होईल आणि नेटकही सुरू राहील. कु ठलाही नवीन कलाप्रकार आला म्हणून आजवर रंगभूमी लयाला गेलेली नाही. रंगभूमीची जादू ही कायम तशीच राहणार. मी स्वत: नाटक करतो आहे, त्यामुळे नाटक कधी करायला मिळणार याची इतरांप्रमाणेच मलाही आस असल्याचे जोशी म्हणाले.

हा लाइव्ह सादरीकरणाचा प्रकार असल्याने यासाठी तंत्रज्ञानाची कशा प्रकारे मदत होईल, याबद्दल मी माझ्या तज्ज्ञ मित्रांशी चर्चा के ली आणि त्यातून मग मार्ग सापडत गेले. हे माध्यम नवीन असल्याने त्यासाठी वेगळ्या कथेची गरज होती आणि तशी तेजस रानडेची कथाही माझ्याकडे होती. या माध्यमासाठी पाश्र्वसंगीत, प्रकाशयोजना या सगळ्याचा नव्याने विचार केला गेला आहे. ‘मोगरा’ पाहताना या नव्या माध्यमासाठी नव्याने कथा लिहिली आहे की या कथेमुळे हे नवे माध्यम जन्माला आले आहे हे वेगळे काढता येणार नाही. इतक्या अप्रतिमपणे त्याची रचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मोगरा’मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते, स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे आणि मयूरी पालांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ही संकल्पना पहिल्यांदाच आकाराला आली असल्याने त्याचे स्वामित्व हक्कही घेण्यात आलेले आहेत. अनेकदा नवे माध्यम, नवी कलाकृती येते तेव्हा इतर कौशल्याबरोबरच त्याच्या कायदेशीर बाबीही महत्त्वाच्या असतात. त्या आता पूर्ण के लेल्या असल्याने नेटक लाइव्ह हा प्रकार आता अन्य कोणीही आमच्याशिवाय करू शकणार नाही. नेटक सादर करत असताना रंगमंचावर कार्यरत ज्या व्यक्ती आहेत, घटक आहेत त्यांनाही यात सहभागी करून घेतले असल्याने याचा आर्थिक फायदा सगळ्यांना होणार आहे. रंगमंच कामगारांना मला अजून यात सहभागी करून घेता आलेले नाही, मात्र गावागावात नाटकाचे बुकिं ग घेणारे कॉन्ट्रॅक्टर, कलाकार-लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार असे सगळेच नेटकमध्ये सहभागी असल्याने त्यांनाही या काळात काम मिळाले आहे. हा लाइव्ह प्रयोग आहे, रेकॉर्डेड नाही, त्यामुळे तिकीट लावून याचे शो के ले जाणार आहेत. आता टाळेबंदीच्या काळात खरे तर कोणालाच कोठे जाता येत नाही आहे, मात्र नेटकचे प्रयोग शहरापासून जगभरात सगळीकडे होणार असून आताच अमेरिका, ऑस्ट्रेलियातही नेटकच्या प्रयोगाचे बुकिं ग झाले असल्याची माहितीही जोशी यांनी दिली.

एकीकडे ‘नेटक’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची जोरदार तयारी सुरू असताना हृषीके श जोशी यांची मुख्य भूमिका असलेली ‘ब्रेथ २’ ही वेबसीरिजही अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजची संकल्पनाच भन्नाट आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिषेक बच्चनबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा ‘ब्रेथ’ प्रदर्शित झाली ती अ‍ॅमेझॉनची पहिली मूळ भारतीय मालिका म्हणून. त्या वेळी अ‍ॅमेझॉनची प्रेक्षकसंख्या कमी होती आणि नेटफ्लिक्सची जास्त होती. मात्र या सीरिजच्या निमित्ताने भारतीय आशय वेब मालिकांमधून सुरू झाला आणि प्राइमची प्रेक्षकसंख्या वाढत गेली. आज प्राइम कु ठे आहे आणि नेटफ्लिक्स कु ठे आहे हे आपण पाहतो आहोत. पहिल्याच वेबसीरिजमध्ये त्यांना माझं काम आवडलं होतं. त्यामुळे जोपर्यंत ‘ब्रेथ’ आहे तोपर्यंत प्रत्येक वेळी अमित साध आणि माझी यात कायम भूमिका राहणार हे पक्के झाले होते. या दुसऱ्या भागात माझी भूमिका अधिक वाढवण्यात आली, अशी माहिती जोशी यांनी दिली. ‘ब्रेथ २’ची पटकथाही अप्रतिम लिहिली गेली आहे. त्यातही माझी भूमिका अधिक लक्षात राहणारी अशी आहे, अशी पावती अभिषेक बच्चनपासून अनेकांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.