मालिका, नाटक, सिनेमा यांमुळे कलाकार कामात प्रचंड व्यग्र असले तरी ते आपापल्या परीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात. वेळेअभावी व्यायामासाठी नेमकी वेळ जमवता येत नसली तरी अनेक कलाकारांनी त्यांचे वेगवेगळे पर्याय शोधले आहेत.

मनोरंजनाच्या क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे तुमचं दिसणं उत्तम असायलाच हवं. उत्तम म्हणजे सुंदर असा इथे अर्थ नक्कीच नाही. उत्तम म्हणजे फिट दिसणं. याचं कारण असं आहे की, सध्या सिनेमा, मालिकांमध्ये साध्या दिसण्यालाही महत्त्व दिलं जातंय. सावळ्या रंगाच्या नायिका पूर्वी बोटांवर मोजण्याइतक्या होत्या. पण, आता या रंगाच्या म्हणजे आजच्या भाषेत डस्की लुकच्या नायिकांचं प्रमाण वाढतंय. सावळ्या रंगालाही आता ग्लॅमर आलंय. सुंदर दिसण्याची व्याख्या हळूहळूू बदलतेय. आता कलाकारांना ‘स्क्रीन प्रेझेन्स’ आहे की नाही हे बघावं लागतं. स्क्रीन प्रेझेन्स म्हणजे टीव्हीच्या किंवा सिनेमाच्या पडद्यावर एखादा कलाकार कशा प्रकारे दिसतोय हे. कलाकारांनाही स्क्रीन प्रेझेन्सचं हे गणित अचूक कळलंय. म्हणून या क्षेत्रात येणारा प्रत्येकजण आपापल्या शरीररचनेबाबत जागरूक असतो. त्यासाठी कलाकार त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देताहेत. केवळ डाएट करून वजनावर ताबा मिळवणं एवढय़ापुरतं ते मर्यादित नक्कीच नाही. तर डाएटबरोबरच कलाकार आता व्यायामालाही जास्त महत्त्व देत असल्याचं दिसून येतं.

कलाकार आणि फिटनेस हे नातं खरंतर खूप जुनं. पण, सिनेसृष्टीतल्या कामाचा आवाका आता वाढलाय. कार्यपद्धती बदलली आहे. कामाचे तासही वाढले आहेत. या बदलल्या स्वरूपाशी जुळवून घेण्यासाठी कलाकारांना त्यांची शारीरिक क्षमता वाढवणं गरजेचं वाटू लागलं. म्हणूनच अनेक कलाकार जिम, व्यायाम, योगा, चालणे, धावणे यावर भर देऊ लागले आहेत. कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतील संत तुकारामांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर रोज सकाळी धावायला जातो. त्याच्या वेळापत्रकाबद्दल तो सांगतो, ‘सकाळी ९ ची शिफ्ट असेल तेव्हा ७ ते ८ या वेळात मी धावायला जातो. सध्या तासाभरात मी सात ते आठ किलोमीटर इतकं धावू शकतोय. या वर्षांखेरीस हाफ मॅरेथॉन धावण्याचं माझं ध्येय आहे. मालिकेच्या शूटिंगच्या वेळामुळे कधी कधी सकाळी धावायला जायला जमत नाही. पण, आठवडय़ातून किमान तीन वेळा मी धावायला जातोच. ज्या दिवशी सकाळी लवकर शूटिंग असेल त्या वेळी रात्री धावायला जातो किंवा घरातल्या घरात इतर काही व्यायाम करतो.’

जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे. पण, काही कलाकारांना ते साकारत असलेल्या भूमिकांसाठी जिममध्ये जाता येत नाही. चिन्मयचंही तसंच काहीसं आहे. तुकाराम ही भूमिका साकारत असल्याने गेली दीड वर्ष तो जिममध्ये जात नाही. पण, म्हणून त्याने व्यायाम करणं थांबावलं नाही. त्याने त्यासाठी लगेचच पर्याय शोधला आहे. नाटकाचे प्रयोग किंवा सिनेमाचे इतरत्र कुठे शूटिंग असेल तर त्या ठिकाणीही सकाळी तो धावायला जातो. ‘व्यायाम सकाळीच करायला हवा असं काही नाही. एखाद्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा. जिममध्ये जाणं शक्य नसेल तर आपण स्वत: त्याला पर्याय शोधून काढणं महत्त्वाचं असतं’, असं चिन्मय सुचवतो. ‘तू माझा..’ ही मालिका करण्याआधी चिन्मय नियमितपणे जिम करायचा. पण तेव्हाही फक्त जिमवर तो कधीच अवलंबून नव्हता. योगा, जॉगिंग, स्विमिंग, जिम या सगळ्याचे आठवडय़ातले दिवस ठरलेले असायचे. पावसाळ्यात धावायला जाणं शक्य नसल्यामुळे चिन्मयने एक चांगली कल्पना शोधली आहे. त्याची बिल्डिंग वीस माळ्यांची आहे. हे वीस मजले दोनदा चढणं आणि उतरणं असा त्याचा व्यायाम ठरलेला आहे.

खरंतर मालिकेचं शूटिंग हे बारा-चौदा तास असतं. इतके तास काम करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. शूटिंगच्या आधी किंवा नंतर अशा दोन्ही वेळा व्यायाम केल्याने थकायला होणं स्वाभाविक आहे. पण, भरपूर तास काम करण्यासाठी क्षमता वाढवण्याकरिता कलाकार मंडळी शूटच्या आधी आणि नंतरही व्यायाम करू लागले आहेत. अशा कलाकारांमध्ये मृणाल दुसानीस हिचा समावेश आहे. कलर्स मराठीच्या ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेची नायिका मृणाल दुसानीस घरच्या घरी व्यायाम करण्यावर भर देते. ‘शूटिंगच्या वेळेनुसार मी रोज सकाळी किंवा रात्री चालायला जाते. दिवसातून किमान पाऊण तास चालणं व्हायला हवं असा मी स्वत:पुरता नियम घालून घेतलाय. काहीजण चालताना विशिष्ट पद्धतीने चाला असा सल्ला देतात. पण, माझ्या मते आपण नेहमी जसे चालतो तसाच वॉक घ्यावा. त्यात बदल करायचाच असेल तर धावणं हा त्यावरील उत्तम मार्ग आहे’, असं मृणाल सांगते. फिट राहण्यासाठी पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचं असल्याचं मृणाल मानते. ती सांगते, ‘शूटिंगमुळे वेळेवर झोप न होणं, पुरेशी झोप न होणे असे प्रकार होऊ शकतात. अशा वेळी झोप पूर्ण होतेय का याकडे लक्ष द्यावं. मी सेटवर असताना दोन सीन्समध्ये मोकळा वेळ मिळाला तर पॉवर नॅप घेते. या छोटय़ाशा झोपेमुळेही मला अनेकदा फ्रेश वाटतं.’ व्यायामासह पुरेशा झोपेचंही महत्त्व मृणाल पटवून देते.

सध्या सगळ्यांचंच जीवन अतिशय वेगवान झालंय. प्रत्येकाला पुढे जाण्याची, पहिलं येण्याची घाई आहे. असं धावपळीचं जीवन जगताना काही गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नाही; असं सर्रास सांगितलं जातं. ज्या गोष्टींसाठी वेळ नसतो त्यात पहिल्या क्रमांकावर असतो व्यायाम. व्यायाम करायला पुरेसा वेळ नाही असं स्पष्टपणे सांगतात. यालाच विरोध करतोय, झी मराठीवरील ‘जय मल्हार’ मालिकेतला खंडोबा साकारणारा देवदत्त नागे. देवदत्त फक्त विरोध दर्शवत नसून तसं करूनही दाखवतोय. त्याच्या मालिकेचं शूटिंग रात्री कितीही उशिरा संपलं तरी तो ते संपल्यानंतर जिममध्ये व्यायामासाठी जातो. खंडोबा ही व्यक्तिरेखा साकारायाची म्हणून देवदत्तने वजन वाढवलं, शरीरयष्टीवर काम केलंय असा प्रेक्षकांचा समज होणं अगदी स्वाभाविक आहे. पण, देवदत्त वयाच्या सोळाव्या वर्षांपासून रोज नियमित व्यायाम करतोय. केवळ भूमिकेसाठी त्याने त्याच्या शरीरावर मेहनत घेतलेली नसून आधीपासूनच तो व्यायामाच्या बाबतीत वक्तशीर आहे. तो सांगतो, ‘व्यायाम करणं ही कला आहे असं मी मानतो. ती कशी जोपासता हे प्रत्येकावर अवलंबून आहे. मालिकेचं शूटिंग रात्री संपल्यानंतर मी जिममध्ये जातो. अनेकदा रात्री दोन-तीन वाजताही जिममध्ये माझं जाणं होतं. दीड तास व्यायाम करून सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास घरी पोहोचतो. थोडा वेळ झोपून पुन्हा शूटिंगला जातो. प्रत्येकाच्या शरीराला विशिष्ट गोष्टींची सवय असते. तसंच माझ्या शरीराला किमान चार तासांची झोप पुरेशी असते. त्यामुळे शूटिंग-व्यायाम यात झोपेकडे दुर्लक्ष होतंय असं नाही. खरंतर व्यायामासाठी ठरावीकच वेळ हवा हे मी डोक्यातूून काढून टाकलंय. अर्थात प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार व्यायाम करतो. पण, सकाळीच झाला पाहिजे असा नियम नाही. सेटवर वेळ मिळाल्यावर तिथेही मी जिमिंग करतो. डंबेल्स, बार्स हे माझं सामान मी सेटवर आणून ठेवलंय. एवढी र्वष व्यायाम करत असल्यामुळे कधी कोणता कसा व्यायाम करायचा हे लक्षात येतं.’ देवदत्तचं वैशिष्टय़ म्हणजे इतरांप्रमाणे तो शूज घालून जिममध्ये व्यायाम कधीच करत नाही.

सिनेमा-नाटक-मालिकांच्या शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कलाकारांना व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळणं तसं थोडं अवघडच असतं. पण, ही अवघड गोष्ट कलाकारांनी आपापल्या परीने सोपी केली आहे. शूटिंगच्या वेळा सांभाळून जिमला जाणं, घरी व्यायाम करणं, धावायला जाणं, चालायला जाणं असे पर्याय कलाकार शोधून काढतात. या पर्यायामध्ये आणखी एका पर्यायाची भर पडतेय. सेटवर जिम उभी करणे. कलाकार त्यांचं जिमचं काही मोजकं सामान सेटवर त्यांच्या रूममध्ये आणून ठेवतात. तिथे वेळ मिळेल तसं किंवा एका विशिष्ट वेळेत व्यायाम करतात. यात आस्ताद काळे या अभिनेत्याचंही नाव घेता येईल. कलर्स मराठीवर काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘सरस्वती’ या मालिकेचा नायक आस्तादने सेटवर त्याचं जिमचं सामान आणून ठेवलंय. त्याविषयी तो सांगतो, ‘कधी कधी आपण राहतो त्या परिसरात जिम नसते किंवा असली तरी तिथे जायला पुरेसा आणि सोयीचा वेळ मिळतोच असं नाही. मग अशा वेळी सेटवर जिमचं थोडं सामान आणून ठेवलं तर फायद्याचं ठरतं. मी आता तसंच केलंय. ‘सरस्वती’च्या सेटवर माझ्या मेकअप रूममध्ये डंबेल्स, बार्स असं आणूून ठेवलंय. सेटवर सलग वेळ मिळेलच असं नसतं. त्यामुळे वेळ मिळेल त्याप्रमाणे एखाद्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम करतो. कधी वेळापत्रक बदललं तर फिटनेसच्या क्षेत्रातल्या काही जाणकारांशी बोलून माझं दिवसाचं वेळापत्रक सांगून योग्य तो सल्ला घेतो. काहीच व्यायाम न करण्यापेक्षा थोडा व्यायाम केलेला केव्हाही चांगलंच.’ भूमिकांसाठी कलाकारांना जाड-बारीक व्हावं लागतं. यावर आस्ताद पूर्ण विश्वास ठेवतो. ‘सरस्वती मालिकेतल्या भूमिकेसाठी माझ्या शरीररचनेबाबत (फिजिकबाबत) काही अपेक्षा होत्या. मी व्यायाम करत होतोच. त्यात थोडी आणखी मेहनत घ्यावी लागली. पण, या प्रक्रियेचा मी आनंद घेतला. माझ्या व्यायाम करण्याचा उपयोग मला भूमिकेसाठी झाला, त्यामुळे त्याचं एक वेगळं समाधान मिळालं’, आस्ताद सांगतो. व्यायामामुळे फक्त शारीरिकदृष्टय़ा फिट राहता येतं असं नाही, तर मानसिकदृष्टय़ाही स्थिर होता येतं. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी मानसिकदृष्टय़ाही स्थिर असणं आवश्यक असतं. तसंच स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठीही व्यायामाचा उपयोग होत असल्याचं आस्ताद सांगतो. ‘मला पटकन राग येतो. माझ्या या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. माणसाचा राग, चिडचिडेपणा, अस्वस्थता या सगळ्यातच व्यायामामुळे समतोल साधता येतो’, असं तो सांगतो.

प्रत्येकाच्याच मनात सायकलबाबत काहीना काही आठवणी असतातच. मग ती शाळेतली असो किंवा सोसायटीच्या मित्रमैत्रिणींसोबतची. आपण कितीही मोठं झालो तरी बालपणीची ती सायकल आणि तिच्या आठवणी आपल्या मनात घर करून असतात. असंच सायकलवर प्रचंड प्रेम करणारी अभिनेत्री आजही सायकलवारी करत असते. स्टार प्रवाहच्या ‘रुंजी’ या मालिकेतली रुंजी म्हणजे पल्लवी पाटील रोज सकाळी किंवा रात्री वीस ते तीस मिनिटं सायकल चालवते. फिट राहण्यासाठी जिमऐवजी सायकल चालवण्याचा पर्याय तिने निवडला. पल्लवी सांगते, ‘मी अगदी लहानपणापासून सायकल चालवते. माझ्याकडे आताही तीन सायकल आहेत. एक बाबांची आणि दोन आम्हा बहिणींची. सुरुवातीला मी जिममध्ये जाऊन व्यायाम करायचे. पण, मला व्यायामातही वेगवेगळं काहीतरी करून बघायला आवडतं. म्हणूनच मी कधी योगा, कधी घरातच व्यायाम असे प्रकार करत असते. पण, प्राधान्य असतं ते सायकल चालवण्याला. मी राहते त्याच्या सभोवतालचं वातावरण अतिशय निसर्गरम्य असं आहे. त्यामुळे अशा वातावरणात सायकल चालवण्याची मजा वेगळीच असते. मालिकेचं शूटनुसार सायकल चालवण्याचं वेळापत्रक आखते. सकाळी लवकर किंवा रात्री अशा दोन वेळांमध्ये किमान वीस ते तीस मिनिटे सायकल चालवते. सायकल चालवणं मी खूप एन्जॉय करते. सेटवर सलग वेळ मिळत नसल्यामुळे तिथे सायकल चालवणं शक्य होत नाही.’

छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर कलाकारांनी चांगलं दिसणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. फक्त मेकअप करून चांगलं दिसण्याला इथे महत्त्व नाही, तर शारीरिकदृष्टय़ाही त्यांनी उत्तम असणं आवश्यक आहे. यासाठी कलाकार डाएट करण्याकडे वळतातच. पण, त्यांचा कल व्यायामाकडेही असतोच. पुरेशा वेळेअभावी व्यायामासाठी ठरावीक वेळ देता येत नसला तरी ते विविध पर्याय शोधूून काढताहेत हे विशेष..!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11