08 August 2020

News Flash

सोनाक्षी-अर्जुनचा ‘तेवर’ पाहण्याची पाच कारणे

दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हा बॉलीवूडमधला अलीकडचा ट्रेंड आहे. नव्या वर्षांची सुरुवातही या ट्रेंडनेच होणार आहे.

| January 8, 2015 05:46 am

दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हा बॉलीवूडमधला अलीकडचा ट्रेंड. नव्या वर्षाची सुरुवातही या ट्रेंडनेच होणार आहे. त्यासाठी बोनी कपूर यांनी तेलगू बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरलेल्या ‘तेवर’ची निवड केली आहे. हमखास यशाचा फॉम्र्युला म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक हे गणित आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच झळकणाऱ्या ‘तेवर’ या चित्रपटाद्वारे सिद्ध होते किंवा नाही ते लवकरच समजेल. अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असणारा तेवर का पाहावा, याची पाच कारणे.

अर्जुन कपूर- ‘इश्कजादे’, ‘गुंडे’, ‘टू स्टेट्स’ अशा चित्रपटांनंतर अर्जुन कपूर आता प्रथमच वडील बोनी कपूर आणि काका संजय कपूर निर्माते असलेल्या ‘तेवर’मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारतोय. ‘इश्कजादे’मधील भूमिका साकारताना त्याने दाखवलेली ऊर्जा आणि सादरीकरणाबद्दल समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी अर्जुनचे चांगलेच कौतुक केले होते. त्यानंतर आता या अॅक्शनपटातून अर्जुन कपूर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आपले ‘तेवर’ दाखविण्यास सज्ज झाला आहे.

सोनाक्षी आणि अर्जुनची जोडी- अमित शर्मा दिग्दर्शित ‘तेवर’ चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर अशी जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये या दोघांचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. याशिवाय, पडद्याबाहेरही दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगत असून अर्जुन आणि सोनाक्षी सध्या डेटिंग करत असल्याचीही चर्चा आहे.

मनोज वाजपेयी- ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर पुन्हा एकदा मनोज वाजपेयी या चित्रपटात ग्रामीण ढंगाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ या चित्रपटातून पदार्पण केल्यापासून आजपर्यंत मनोज वाजपेयीची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याला पडद्यावर पाहणे हा प्रेक्षकांसाठी नेहमीच आनंददायी अनुभव असतो.

दाक्षिणात्य रिमेक- दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हा बॉलीवूडमधला अलीकडचा ट्रेंड आहे. वेगवान कथानक, भरमसाट आडवीतिडवी गाणी, गाण्यांचे भडक चित्रीकरण, वाट्टेल तो विनोद आणि बेसुमार हाणामारी हा अगोदरच सिद्ध झालेला दाक्षिणात्य फॉम्र्युला हिंदी चित्रपटांमध्येही रूळताना दिसत आहे. हिंदी सिनेमांचे अर्थकारण आणि उलाढाल प्रचंड वाढल्यामुळे आणि वर्षांची सुरुवात म्हणून अनपेक्षित कथानक, नवीन गोष्ट, नवीन ‘ट्रीटमेंट’ प्रेक्षकांसमोर आणण्यापेक्षा अगोदर सिद्ध झालेला फॉम्र्युला आणि तिकीटबारीवर हमखास यश मिळण्याची आशा असलेला सिनेमाच का करू नये असा ‘गल्लाभरू’ विचार बॉलीवूडचे तथाकथित निर्माते-दिग्दर्शक सर्वच जण करताना दिसतात.

चित्रपटाचे संगीत- ‘तेवर’ या चित्रपटाची आतापर्यंत जी काही हवा निर्माण झाली आहे, त्यामध्ये चित्रपटाच्या संगीताचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. सध्याच्या तरूणाईला वेड लावणाऱ्या संगीतकार साजिद-वाजिद यांच्या तेवरमधील ‘मे तेरा सुपरमॅन, सलमान का फॅन’ या गाण्याने आणि ‘राधा नाचेगी’ या नृत्यप्रधान गाण्याने प्रेक्षकांना अगोदरच वेड लावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2015 5:46 am

Web Title: five reasons to watch sonakshi sinha arjun kapoor tevar
Next Stories
1 रजा वाढविण्याच्या अर्जावर निकाल येईपर्यंत संजूबाबाला तुरूंगाबाहेर राहण्याची मुभा
2 ‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वलपटाद्वारे श्रेयसचे दिग्दर्शनात पदार्पण
3 नाटकामुळे आयुष्य समृद्ध होते – अनासपुरे
Just Now!
X