यंदा २०१८ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी खास ठरलं. या वर्षभरामध्ये बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या आणि लोकप्रिय जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या. त्यामुळे या सेलिब्रिटींसाठी आनंदाचं आणि तेवढंच अविस्मरणीय ठरलं. २०१८ मध्ये बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिच्यापासून लग्नसराईला सुरुवात झाली ते ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या लग्नापर्यंत सुरु होती. या काळात अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. चला तर मग पाहुयात कोण कोणत्या सेलिब्रेटी २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकल्या –

१.सोनम कपूर- आनंद आहुजा –

बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनम कपूरने ८ मे २०१८ च्या शुभ मुहूर्तावर प्रियकर आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. आनंद हा भाने ब्रँडचा मालक आहे. ‘खुबसूरत जोडी’ लग्नामध्ये सारं काही खास होतं. त्यामुळे या लग्नाच्या विशेष चर्चा रंगल्या होत्या. यात सोनमचं मंगळसूत्र आणि तिने बोटात घातलेली अंगठी हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. सोनमने तिचं मंगळसूत्र स्वत: डिझाइन केलं होतं. यामध्ये सोनम आणि आनंद यांच्या राशीच्या चिन्हाचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे हे मंगळसूत्र तिच्यासाठी खास ठरलं होतं.

२. नेहा धुपिया – अंगद बेदी –
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपियाने गुपचूप पद्धतीने अभिनेता अंगद बेदी याच्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाचा कोणताही गाजावाजा न करता तिने लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अनेकांकडून बरेच प्रश्न निर्माण केले गेले. नेहा लग्नापूर्वीच गरोदर असल्यामुळे तिने घाईमध्ये लग्न उरकल्याचं नंतर समोर आलं. एका मुलाखतीमध्ये अंगदनेही नेहा लग्नापूर्वीच गरोदर असल्याचा खुलासा केला होता. सध्या ही जोडी आनंदात असून नेहाने एका मुलीला जन्म दिला आहे.

neha dhupia, angad bedi
नेहा धुपिया, अंगद बेदी

३. दीपिका पदुकोण -रणवीर सिंग
बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीमध्ये लेक कोमा परिसरातील एका व्हिलामध्ये लग्न केलं. डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिलेल्या या जोडीने कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. यावेळी काही ठराविक मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र या जोडीने बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अन्य मित्रपरिवारासाठी तीन रिसेप्शन पार्टीचं आयोजनही केलं होतं. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी या पार्टीमध्ये त्यांच्या लोकप्रिय गाण्यावर ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं होतं.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा लग्नातील फोटो

४. प्रियांका चोप्रा- निक जोनास –
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी सिंधी आणि ख्रश्चिन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. इतकंच नाही धुमधडाक्यात झालेल्या या लग्नामध्ये अनेक अडथळेही निर्माण झाले होते. निक-प्रियांकाच्या लग्नामध्ये हत्ती आणि घोडे यांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. तर लग्नात आतिषबाजी केल्यामुळेही त्यांना टिकांना सामोरं जावं लागलं होतं. या लग्नानंतर या जोडीने दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यातील एक बंगळुरुमध्ये होतं. तर दुसरं मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शन पार्टीनंतर ही जोडी ओमानमध्ये हनीमूनसाठीदेखील गेली होती.

५. कपिल शर्मा -गिन्नी चतरथ –
‘कॉमेडीचा बादशहा’ कपिल शर्माने त्याच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. प्रेयसी गिन्नी छत्ररथशी त्याने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नीचा विवाहसोहळा पार पडला. कपिलने त्याच्या गावी अमृतसरमध्ये लग्न केलं असून यावेळी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

६. इशा अंबानी- आनंद पिरामल –
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा अंबानीने १२ डिसेंबरला उद्योजक आनंद पिरामलसोबत लग्न केलं. मुंबईतील ‘अँटीलिया’ या अंबानी कुटुंबियांच्या आलिशान इमारतीत हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. या लग्नाच्याही विशेष चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे या लग्नामध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन यासारख्या दिग्गज कलाकार मंडळींनी उपस्थित पाहुण्यांना जेवण वाढलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी या कलाकार मंडळींना वाढपी म्हणून संबोधलं होतं. मात्र बिग बी आणि अन्य कलाकार मंडळींनी असं का केलं याचं उत्तर अभिषेक बच्चनने दिल्याचं पाहायला मिळालं.