बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्याची चलती असते, मात्र हे समीकरण गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदललं आहे. २०१८ मध्ये बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ला मागे टाकत अभिनेत्रींनी आपली जागा कायम केली आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या ‘खान’दानाला मागे टाकत बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया अशा सर्वच ठिकाणी हे वर्ष गाजवणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहू.

दीपिका पादुकोन
दीपिका पादुकोनसाठी २०१८ हे वर्ष तिच्या करिअरला पूर्णपणे कलाटणी देणारं वर्ष ठरलं. लोकप्रिय अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आघाडीची अभिनेत्री , सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री या सर्वच यादीत दीपिका अव्वल ठरली. ‘पद्मावत’ सिनेमाच्या यशानंतर तर चित्रपटसृष्टीत तिनं आपलं स्थान पक्क केलं. सध्याच्या घडीला सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान या तिन्ही सुपरस्टार्सनां मागे टाकत तिने हे स्थान मिळावलं आहे. गेल्याच महिन्यात ती अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबंधनात अडकली. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनसंघर्षावर आधारित चित्रपटात दीपिका प्रमुख भूमिकेत आहे.

प्रियांका चोप्रा
‘क्वांटिको’ मालिकेनंतर प्रियांका ही केवळ बॉलिवूड अभिनेत्री न राहता ती ग्लोबल स्टार झाली. बॉलिवूडच नाही तर जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाच्या नावाची गणना होऊ लागली. भारतातील आघाडीच्या दहा सेलिब्रिटींच्या यादीत प्रियांकाचं नाव घेतलं जातं. या महिन्याच्या सुरूवातीला ती अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकली. लवकरच ती दी स्काय इज पिंक या चित्रपटात झळकणार आहे.

राधिका आपटे
हे वर्ष राधिका आपटेसाठाही खूप महत्त्वपूर्ण ठरलं. या वर्षात प्रदर्शित झालेल्या जवळपास सर्वेच प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये राधिका झळकली. ‘सेक्रेड गेम्स’, ‘घोल’, ‘लस्ट स्टोरिज’ यासारख्या वेबसीरिज, ‘बाझार’, ‘अंधाधून’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटातही ती झळकली. यावर्षांतली ‘वेबसीरिज क्वीन’ म्हणून ती ओळखली गेली.

आलिया भट्ट

या वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या चित्रपटानं आलिया ही २०१८ मधली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयासाठी तिला या वर्षातले जवळपास सर्वच महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.  मात्र असं  असलं तरी सर्वाधिक मानधन घेण्यास मात्र तिनं नकार दिला. ती अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रणबीरसोबतचा तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पुढील वर्षात प्रदर्शित होत आहे.

स्वरा भास्कर
समाजातील विविध विषयावर अत्यंत बेधडकपणे आपलं मत मांडणारी अभिनेत्री म्हणून स्वरा ओळखली जाते. आतापर्यंत क्वचितच एखाद्या अभिनेत्रीनं सामाजिक विषयांवर आपली मत मांडली असतील मात्र स्वरा अगदी बिंधास्तपणे सोशल मीडियावर आपली मत मांडते, एखादी गोष्ट पटली नाही तर आवाजही उठवते. जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटातील एका दृश्यामुळे स्वरा वादात सापडली होती. मात्र तरीही तिनं प्रत्येकाच्या टीकेला मोठ्या संयमानं उत्तर दिलं. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणारी अभिनेत्री ती ठरली आहे.