कोणत्याही चित्रपटाचा शुक्रवारचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा खेळ संपत नाही तोपर्यंत तो हिट अथवा सुपर हिट ठरेल याचे कोणतेही ठोकताळे मांडूच नयेत हे तर सर्वकालीन सत्य. तरीही त्याचा कधी कधी विसर पडलाय. ‘स्टार’ (१९८२) हा चित्रपट अगदी तसाच. कुमार गौरवचा पहिलाच चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ (१९८१) यशस्वी ठरताच ज्युबिली कुमार अर्थात राजेंद्र कुमारचा हा सुपुत्र देखिल ‘स्टार’च बनणार व राजेश खन्नासारखा रोमॅन्टिक हिरो म्हणूनच गाजणार अशी केवढी तरी चर्चा रंगली. त्या काळातील युवा अभिनेत्रींनी त्याच्यासोबत नवे चित्रपट स्वीकारले. कुमार अर्थात बंटीचा पूनम धिल्लॉनसोबतच्या ‘तेरी कसम’ (१९८२) च्या यशाला मर्यादा पडूनही प्रसार माध्यमातून ‘स्टार’ घडवता येत नाही तर प्रेक्षकांना चित्रपट आवडावा लागतो याचे भान यायला हवे होते ना?

राजेंद्र कुमार व कुमार गौरव या पिता पुत्रांची ‘स्टार’ चित्रपटावर कमालीची भिस्त होती. अर्थात त्याला कारणेही तशीच होती. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ (१९८०) मधील ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये…’ गाण्याच्या अफाट लोकप्रियतेने नावारूपास आलेला संगीतकार बिद्दू व गायिका नाझिया हसन यांचा ‘स्टार’ चित्रपटाशी थेट संबंध. ‘स्टार’ चित्रपटाचा निर्माता, कथाकार, पटकथाकार, संगीतकार बिद्दू आणि चित्रपटात तब्बल नऊ गाणी. आणि त्याना शोएब हसन व नादिया हसन यांचे आवाज. ‘आप जैसा..’च्या अफाट लोकप्रियतेने हिंदी चित्रपट संगीतात नवे पर्व आल्याचे काहींचे मत. (खरं तर ‘कुर्बानी’मधील संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची इतरही गाणी लोकप्रिय होती. पण ‘आप जैसा…’मध्ये ती बाजूला पडली). ‘स्टार’ चित्रपट सुपर हिट ठरेल आणि कुमार गौरव ‘स्टार’ बनेल या वातावरणात आणखीन भर पडत होतीच. ‘एक बार फिर’ या चित्रपटाने नावारूपास आलेला दिग्दर्शक विनोद पांडेच येथे होता. या संगीतमय प्रेमपटाला पद्मिनी कोल्हापूरे व रति अग्निहोत्री अशा दोन नायिका लाभल्या. ‘बूम..बूम..’ हे गाणेही लोकप्रिय झाले. ‘तेरी जिंदगी मे…’देखील ऐकू येत होते. इतके सगळे जमून येतानाच आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. ‘लव्ह स्टोरी’ रौप्य महोत्सवी ठरलेले मेट्रो थिएटर ‘स्टार’लाही मेन थिएटर लाभले. आता प्रीमियर देखिल दणक्यात व्हायलाच हवा. तो देखील झाला. पण… पण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासूनच प्रेक्षक आलेच नाहीत. जे आले त्याना संगीत व चित्रपट कुठेतरी परका वाटला. त्या वर्षीचा सर्वाधिक बहुचर्चित अपयशी चित्रपटाचा जणू मानच ‘स्टार’ला मिळाला आणि त्यानंतर ‘लव्हर्स’, ‘ऑलराउंडर’ इत्यादी फ्लॉप चित्रपटानी त्याच्या नावावर जणू रांग लागली. ‘स्टार’ नावाच्या चित्रपटाने कोणी ‘स्टार’ कसे हो बनेल? म्हटलं ना, प्रीमियर दणक्यात झाला तरी पहिल्या दिवसाचा प्रेक्षक चित्रपटाबाबत काय बरे म्हणतोय हे जास्तच महत्त्वाचे असते म्हणून. तात्पर्य प्रेक्षकांना कोणीच गृहित धरु नये हेच सर्वकालीन मोठेच सत्य आहे.
दिलीप ठाकूर

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर