11 December 2017

News Flash

फ्लॅशबॅक : जोगिंदरचा सिनेमा म्हणजे काय?

कमालीचा अतिरंजितपणा हे या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य.

दिलीप ठाकूर | Updated: October 6, 2017 5:36 AM

आजच्या करण जोहर, संजय लीला भन्साली , कबीर खान अशा दिग्दर्शकांचे चित्रपट पाहणाऱ्या रसिकांना हे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार? अनेकांनी कदाचित जोगिंदर हे नावच सर्वप्रथम ऐकले असेल. पण सत्तरच्या दशकातील चित्रपट रसिक मात्र एव्हाना फ्लॅशबॅकमध्ये गेले असतील. गंमत म्हणजे त्याना जोगिंदरचे चित्रपट माहित असले तरी त्यातील त्यानी एखादा पाहिला असण्याची शक्यता तशी कमीच असणार. बिंदीया और बंदूक, दो चट्टाने, फौजी इत्यादी चित्रपट त्याने निर्माण केले, त्यातील हे तर मुंबईतही यशस्वी ठरले हे विशेषच. अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटाना प्रामुख्याने उत्तर भारतातील असंख्य छोट्या छोट्या शहरांतून अक्षरश: उदंड/ प्रचंड प्रतिसाद मिळे. कमालीचा अतिरंजितपणा हे या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य. त्यामुळेच अशा चित्रपटांची समिक्षाच होत नसे. कारण समिक्षा वाचून चित्रपट पहावा असे जोगिंदरच्या चित्रपटाचे चाहते नव्हते. गंमत म्हणजे त्याच्या चित्रपटाचा हुकमी क्राऊड होता. एकाच चित्रपटात तो प्रेमत्रिकोण, भाऊबंदकी, देशभक्ती, जवानाची गोष्ट, डाकूचे आक्रमण, एखादा सण, सामाजिक संदेश असे सगळेच एकमेकांत कोंबायचा. हे कसब-कौशल्य असते. आणि ही गोष्ट उत्तर भारतातील एखाद्या गावात घडे. प्रत्यक्षात चित्रीकरण मुंबईत चांदिवली, एसेल स्टुडिओत होई. सहज जाता जाता आंबटशौकीनाना खुश करे. पल्लेदार संवादाना हमखास टाळ्याही मिळवे. समाजातील कष्टकरी कामगार वर्गाला त्याचे चित्रपट सवंग असला तरी तो समजेल असाच अनुभव, आनंद देत. सगळेच दिग्दर्शक राज कपूर, गुरुदत्त, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, मनमोहन देसाई असू शकत नाहीत. कोणी जोगिंदर देखिल असतो. स्वतः जोगिंदरने याचे भान कधीच सोडले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपले नेमके कार्यक्षेत्र काय आहे, आपण कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकतो यावर त्याने भर देत यशस्वी वाटचाल केली. दो चट्टाने या चित्रपटात विक्रम व आशा सचदेव यांचा अभिनय होता. याशिवाय प्रेमा नारायण, गुलशन अरोरा, कबीर बेदी, स्वतः जोगिंदर असेच त्याच्या चित्रपटात कलाकार असत. ए ग्रेडचे स्टार आपल्या चित्रपटातून भूमिका करीत नाहीत याची त्याने कधीच खंत बाळगली नाही. तो स्वतः अन्य चित्रपटात धर्मेंद्र (हुकुमत) इत्यादींसोबत काम करे. पण आपली चित्रपट संस्कृती व आपले इतर चित्रपटातील काम याची त्याने कधीच गल्लत केली नाही. त्याचे चित्रपट मुंबईत प्रामुख्याने सुपर टॉकिजला प्रदर्शित होत. ते प्ले हाऊस थिएटर्सच्या अगदीच जवळचे. आपल्या चित्रपटाचा जसा प्रेक्षक तसेच त्याचे मुख्य चित्रपटगृह असावे ही तर कमालीची व्यावसायिक रणनीती होय. जोगिंदरचा चित्रपट समाज मान्यता, प्रतिष्ठा मिळवू शकला नसेलही पण हाऊस फुल्ल गर्दीत ते पाहिले गेले हे जास्तच महत्त्वपूर्ण. चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर वा चांगले काहीच नाही. मग चित्रपटाच्या दर्जाची चिंता कोणी का करेना?
दिलीप ठाकूर

First Published on October 6, 2017 5:36 am

Web Title: flashback by dilip thakur joginder