हे छायाचित्र कोणत्याही चित्रपटातील नाही. जर असते तर, ते ‘जय शिव शंकर’ (१९८९) या चित्रपटातील असते. कारण या पती-पत्नीने एस. व्ही. चंद्रशेखर दिग्दर्शित याच एकमेव चित्रपटातून एकत्र काम केले व त्याचा निर्माता खुद्द राजेश खन्नाच होता. हे छायाचित्र निवडणुकीतील प्रचाराचे आहे. ते देखिल १९९१ च्या लोकसभा निवडणुकीतील दक्षिण दिल्ली मतदारसंघातील आहे. पण एवढ्यावरच ‘या फोटोची गोष्ट’ संपत नाही.

चित्रपट कलाकार राजकारणात प्रवेश करणे हे तोपर्यंत नवीन राहिले नव्हते. पण एकेकाळचा हा सुपर स्टार कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असे वाटले नव्हते. इंदिरा काँग्रेसचा उमेदवार म्हणून राजेश खन्ना या निवडणुकीत उभा होता. पण कोणाविरुध्द? तर भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांच्याविरोधात! एकूणच प्रसार माध्यमाचे याच मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित झाले नसते तरच नवल होते.

राजेश खन्नाच्या प्रचाराचा सगळाच भर प्रचार फेरीवर. आपल्या लोकप्रियतेला मतदान होईल यावरच त्याचा विश्वास असणे आश्चर्याचे नव्हते. कारण तो अस्सल फिल्मवाला होता. पण खरी गंमत अगदी अनपेक्षितपणे डिंपल प्रचाराला आल्यावर आली. याचे कारण एकच. त्या काळात हे पती-पत्नी वेगळे राहत होते. तेदेखील १९८२ सालापासून. त्यानंतर रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ (१९८५) पासून डिंपलची सेकंड इनिंग सुरु होऊन ती खूप कार्यरतही झाली होती . पण कौटुंबिक जीवनात वाद असला तरी पतीच्या मदतीला पत्नीने धावून येणे आपल्या संस्कृतीत स्वाभाविक आहे. या घटनेवर तेव्हा अशीच प्रतिक्रिया उमटली व तीच महत्त्वाची गोष्ट आहे. दरम्यान ते ‘जय शिव शंकर’साठी एकत्र आले होतेच. पण निवडणूक प्रचारात डिंपल येणे हीच मोठी बातमी झाली. या घटनेचा जणू रिमेकही झाला.

दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी विजयी झाले व अर्थातच राजेश खन्ना पराभूत झाला. पण अडवानी त्याच वेळेस गांधीनगर (गुजरात) मतदारसंघातूनही विजयी झाले. त्यानी त्यामुळे दक्षिण दिल्लीच्या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळेच दक्षिण दिल्लीत पोटनिवडणूक घेणे आवश्यक ठरले. ती मात्र चंदेरी, रुपेरी, सोनेरी झाली. कारण इंदिरा काँग्रेसने आपला उमेदवार राजेश खन्नाच कायम ठेवून मैदानात उतरणे पसंत केले. तर भाजपने आपला उमेदवार म्हणून शत्रुघ्न सिन्हाला उभे करून रंगत आणली. तो भाजपचा प्रथमपासूनच समर्थक. म्हणजेच त्याची उमेदवारी योग्य.

दोन्ही उमेदवारांचा भर प्रचार फेरीवर. आणि दोघांनाही भरपूर प्रतिसाद. आणि अशातच एकदा (की पुन्हा?) डिंपल राजेश खन्नासोबत प्रचार फेरीत आली. स्टार पती-पत्नी निवडणूक प्रचारात हीच फोटो बातमी झाली हे पुन्हा वेगळे सांगायलाच नको. फोटो बोलायला हवा तो हा असा. पोटनिवडणुकीचा निकाल राजेश खन्नाच्या बाजूने लागला. आणि अनेकांनी त्याचे श्रेय डिंपल प्रचाराला आली (एकदा तर ट्विंकलला घेऊन आली) याला दिले. निवडणुकीला फिल्मी रंग आला.
दिलीप ठाकूर