बॉलिवूड आणि वादविवाद हे जणू समीकरण ठरलेलंच आहे. अभिनेत्यांमधील वादविवाद, अभिनेत्रींमधील कॅटफाइट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. वाढत्या स्पर्धेमुळे, प्रेमाच्या त्रिकोणामुळे, किंवा अन्य कोणत्याही लहानसहान गोष्टींवरून हे कॅटफाइट होतच असतात. ८०च्या दशकात बॉलिवूडमधील असाच एक वाद चर्चेचा विषय ठरला होता. हा वाद अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आणि अमृता सिंग यांच्यामध्ये झालेला.

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘आवारगी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मीनाक्षी व्यग्र होती. एका महत्त्वपूर्ण दृष्याचं चित्रीकरण होत असताना मीनाक्षीने अमृता सिंगला सेटकडे येताना पाहिलं. अमृता महेश भट्ट यांना भेटण्यासाठी तेथे आली होती. दोघांचीही भेट झाली आणि सेटवरच त्यांच्यात गप्पा रंगू लागल्या. त्यांच्या गप्पा आणि हसूचा मीनाक्षीला शूटिंगदरम्यान त्रास होऊ लागला. तिचं लक्ष विचलित होत असल्याने अनेकदा तिला रिटेक घ्यावे लागत होते. काही वेळाने हे महेश भट्ट यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मीनाक्षीला थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा शूटिंग करण्यास सांगितले. तोपर्यंत तिचाही पारा चढला होता. मात्र, दिग्दर्शक असल्याने ती त्यांना काहीच उत्तर देऊ शकली नाही. तावातावाने मेकअप रुमकडे जाताना ती अमृतावर भडकली. त्यावर अमृतानेही प्रत्युत्तर दिलं. आमच्या गप्पांकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या अभिनय कौशल्यावर जास्त भर दे, असे अमृताने उलट सुनावले.

या वादाची त्यावेळी बॉलिवूड विश्वात चांगलीच चर्चा झाली होती. सेटवरील हे भांडण अनेकांनाच माहीत झालं होतं. त्यानंतर अमृता आणि मीनाक्षी अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकींना टाळू लागल्या. अखेर एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारांशी वाद फार काळापर्यंत खेचणं योग्य नाही याची जाणीव ठेवत मीनाक्षीने बोलण्यासाठी पुढाकार घेतला. एका म्युझिक लाँच कार्यक्रमात मीनाक्षी स्वत:हून अमृताकडे बोलायला गेली आणि इतकंच नाही तर प्रसारमाध्यमांसमोर अमृताच्या सौंदर्याचीही प्रशंसा तिने केली. तेव्हा अमृतानेही वाद तिथेच संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॉलिवूडमधल्या या कॅटफाइटचा शेवट मात्र गोड झाला असं म्हणायला हरकत नाही.