13 December 2018

News Flash

फ्लॅशबॅक : हम आपके दिल मे रहते है…

अनिल कपूर व काजोल जोडीच्या चित्रपटाबाबत विशेष कौतुक व उत्सुकता

'हम आपके...'ने मुंबईतील मेन थिएटर नॉव्हेटीत यश मिळवताच डी. रामा नायडूने लगेच पार्टीच आयोजित केली.

अनिल कपुर व काजोल यांनी एकत्र भूमिका केलेला चित्रपट तुम्हाला आठवतोय? अनिल कपूर प्रामुख्याने श्रीदेवी व माधुरी दीक्षितचा नायक तर काजोलची शाहरुखशी हिट जोडी. म्हणूनच तर अनिल कपूर व काजोल जोडीच्या चित्रपटाबाबत विशेष कौतुक व उत्सुकता! हा चित्रपट होता, ‘हम आपके दिल मे रहते है’ (१९९९).

हे छायाचित्र त्याच चित्रपटाच्या यशाच्या पार्टीतील आहे. तनुजा व काजोल या आई व मुलीसोबत या चित्रपटाचे निर्माते डी. रामा नायडू आहेत. त्यानी हिंदीसह अनेक तमिळ, तेलगू चित्रपटांची निर्मिती केलीय. या चित्रपटाच्या हैदराबाद येथील चित्रीकरणाच्या वेळेस मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांचाही दौरा आयोजित केला. हा चित्रपट त्यांच्याच ‘पवित्र बंधन’ या तेलगू चित्रपटाची रिमेक. मूळ चित्रपटात व्यंकटेश व सौंदर्या अशी जोडी होती. पटकथा भूपती राजा याची. हिंदीत सतिश कौशिकने दिग्दर्शन केले.

दक्षिणेकडील चित्रपटात कौटुंबिक- सामाजिक गोष्टी खच्चून भरलेल्या आणि सोशिक नायिकेला सहानुभूती देणार्‍या. येथेही तोच प्रकार. आणि अशा चित्रपटांचा पूर्वी हुकमी प्रेक्षकवर्गही होता. ‘हम आपके दिल मे रहते है’ चित्रपटात अनुपम खेर, शक्ती कपूर, स्मिता जयकर, राकेश बेदी, जॉनी लिव्हर, परमीत सेठी, सुधाचंद्रन यांच्यासह ग्रेसी सिंगही होती. पण ती होती याची चर्चा वा जाणीव कधी झाली माहित्येय? ‘लगान’ (२००१) साठी आमिर खानची तिची जेव्हा ‘नायिका’ म्हणून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने निवड केली तेव्हाच.

‘हम आपके…’ने मुंबईतील मेन थिएटर नॉव्हेटीत यश मिळवताच डी. रामा नायडूने लगेच पार्टीच आयोजित केली. यश ताजे असतानाच त्याचा आनंद साजरा करावा हेच खरे… या छायाचित्रात तेच दिसतयं. चित्रपटातील ‘हम आपके दिल मे रहते है…’ (पार्श्वगायक कुमार शानू व अनुराधा पौडवाल) हे अन्नू मलिकने संगीतबद्ध केलेले गाणे तुम्ही कधी गुणगुणले असालच.
दिलीप ठाकूर

First Published on March 9, 2018 11:42 am

Web Title: flashback hum aapke dil mein rehte hain