स्थळ- मेहबूब स्टुडिओ,वांद्रे
निमित्त- ‘तेजाब’च्या गाण्याचे चित्रीकरण

दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्याशी ‘अंकुश ‘पासूनचा परिचय. त्यांच्याच ‘प्रतिघात’च्या नाशिकच्या चित्रीकरणाच्या वेळेस जाणेही झाले होते. नटराज स्टुडिओतील अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘तेजाब’चा मुहूर्त (२७ फेब्रुवारी १९८७) अनुभवलेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर एन. चंद्रा सेटवर बोलवत आहेत म्हणजे काही तरी खासच असणार असाच विश्वास होता .

मेहबूबमध्ये शिरलो तोच बरीच ‘बिनचेहर्‍याची भरपूर गर्दी’ दिसली. क्षणभर अर्थ लागेना. सेटवर पाऊल टाकले तेव्हा एन. चंद्रा अशाच गर्दीला स्पीकरवरून ओरडत सूचना देत होते. कॅमेरामॅन बाबा आझमी ट्रॉलीवर होता. एका बाजूला सुपर्णा आनंद बसली होती (तिचे अस्तित्व जाणवायचा प्रश्नच नव्हता) आणि…… माधुरी दीक्षित नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून स्टेप्स समजून घेत होती. माहौल नेहमीपेक्षाही वेगळाच. माधुरीला या सगळ्या परिस्थितीत कॅमेर्‍याची जागा लक्षात घेत नृत्य साकारायचे होते. शिफ्ट वाढवून शूटिंग करायचे असल्याने दमछाक होण्याची शक्यता होती. या गडबडीत चंद्रा यांच्याशी भेट होताच ते इतकेच म्हणाले, आज हा सगळाच अनुभव तू घे. नंतर एकदा घरी आल्यावर सविस्तर बोलू. चंद्रा तेव्हा सांताक्रूझ पश्चिमेला प्रकाश बिल्डिंगमध्ये राहात व त्या काळात शूटिंग कव्हरेज म्हणजे जे काही सेटवर घडतयं ते अनुभवणे होते. यावेळचा अनुभव थरारकच म्हणायचा. सेटवरील वातावरण अधिकाधिक उत्साही बनावे म्हणून चंद्रा गाणे पुन:पुन्हा लावायला सांगत होते.

एक दो तीन चार पाच …. दस ग्यारह बारा तेरा
तेरा करु गीन गीन के इंतजार
आजा पिया आई बहार..

जावेद अख्तरने असे ‘आकड्यातील गाणे’ लिहावे याचे आश्चर्य वाटले पण संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी मस्त चाल लावत ते धमाल रंगवलयं हे लक्षात आले. माझी चलबिचल पाहूनच की काय, चंद्रा इतकेच म्हणाले, हे गाणे चित्रपटात दोनदा आहे. येथे ही गर्दी दिसतेय यात ज्युनिअर आर्टिस्ट कमी आहेत. माधुरीच्या नृत्यावर स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त व्हाव्यात म्हणून मी सर्वसामान्यांना सेटवर आणलयं.
येथे (देखील) दिग्दर्शक दिसतो असेच म्हणावेसे वाटले. कॅमेरा ऑन होताच माधुरीत कमालीचा सकारात्मक बदल दिसला. ती प्रचंड चार्ज झाल्याचे लक्षात आले. कोणतेही गाणे तुकड्यात चित्रीत होत असते. कॅमेऱ्याची जागा बदलत जात असते. या गडबडीत माधुरी कुठे कंटाळलीय असे दिसले नाही. रात्री उशिरापर्यंत हे शूटिंग रंगले. माधुरी प्रचंड घाम गाळत नाचे आणि आपल्या क्षमतेचा प्रत्यय देई. आणखीन काही दिवसातच हे चित्रीकरण पूर्ण झाले. काही महिन्यात चित्रपटही पूर्ण झाला.

हे गाणे प्रचंड लोकप्रिय होईल याचा सेटवरच अंदाज येत होता. पण ते इतके व असे सुपर हिट ठरवल्यावर चित्रपट प्रदर्शित कधी बरे होतोय याची प्रचंड उत्सुकता असणारच. १९८८ च्या दिवाळीत ‘तेजाब’ झळकला तोच सुपर हिट होण्यासाठीच. मुंबईत त्याचे मुख्य चित्रपटगृह ड्रीमलॅन्ड होते. चित्रपट जोरात चालतोय म्हणून चंद्रा यांनी प्रेक्षकांना बोनस द्यायचे ठरवले. त्यांनी अनिल कपूर व माधुरीवर आणखी एक गाणे चित्रीत करुन ते चित्रपटात समाविष्ट केले.

माधुरीच्या चौफेर वाटचालीतील एक दो तीन.. तेजाब नृत्याचा आंखो देखा हाल नुसता आठवला तरी तिच्या यशात अथक मेहनतीचा मोठा वाटा आहे हे वेगळे सांगायची गरजच नसते.