सुभाष घईला ‘शोमॅन’ म्हटलं जाई त्यातील अनेक घटकांतील एक म्हणजे, आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्त, सेट, यशाची पार्टी याना मीडियाला खास आमंत्रित करणे. त्यामुळेच ‘घईच्या कार्यशैली’चे छान दर्शन होई, अनुभव मिळे. पण सेटवर दिलीपकुमार असेल तर? मग घई काहीसा बाजूला पडत असेल असेच तुम्हाला वाटेल, पण घईची खासियत म्हणजे प्रत्येक कलाकाराची मानसिकता, प्रवृत्ती, अपेक्षा जाणून (की जोखून?) काम करणे . ‘येथेही दिग्दर्शक दिसतो’ असे व्यावसायिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, म्हटले तरी चालेल.
सुभाष घईच्या चक्क तीन चित्रपटात दिलीपकुमार उगचं होता काय? ‘विधाता’त दिलीपकुमार, शम्मी कपूर व संजीवकुमार असे तिघे एकत्र तर ‘सौदागर’मध्ये दिलीपकुमार व राजकुमार ‘पैगाम’ (१९५९) नंतर बत्तीस वर्षांनी एकत्र आले. घईच्या दिग्दर्शनातील दिलीपकुमारची झलक ‘कर्मा’ (१९८६)च्या सेटवर अनुभवावयास मिळाली.  गोरेगावच्या चित्रनगरीत बाहेरच्या बाजूला पोलीस स्टेशन, मोठे कारागृह याचा भला मोठा सेट लावतानाच बहुदा चित्रीकरणाचे दिवस मोजायचे नाहीत असे घईमधील निर्मात्याने पक्के केले असावे. त्या दिवसात कोणताच चित्रपट दिवसाच्या हिशेबात निर्माण होत नसे व चालतानाही दिवस नसे, तर आठवडे मोजले जात.

सकाळपासून सेटवर लगबग असली तरी दिलीपकुमार पूर्ण तयार होऊन बारा-साडेबाराला सेटवर आल्यावर लगेचच चित्रीकरण सुरु झाले नाही. सभोवार नजर टाकून परिस्थितीचा अंदाज घेतला. सेटवर सिनेपत्रकार आहेत हे लक्षात येताच ‘काहीच हरकत नाही’ असे काहीसे भाव चेहर्‍यावर उमटले. घई तोपर्यंत जणू या साहेबाची वाट पहात उभा तरी मुळात तोही एकेकाळचा अभिनेताच, मग पटकथाकार. त्यामुळेच त्याला साहेबास दृश्य कसे समजावून सांगायचे, कॅमेरा नेमका कुठे आहे, किती कॅमेरे आहेत, ते कसे कव्हर करणार आहेत हे सगळेच त्याच्या माईंडमध्ये फिट होतेच. तोपर्यंत त्याने मुकरी इत्यादींवरची काही दृश्ये चित्रीत करून वातावरणात चैतन्य आणले होतेच. दिलीपकुमारने घईचे सगळेच म्हणणे अगदी काळजीपूर्वक ऐकले, क्षणभर काही विचार केला, घईकडे एकवार रोखून पाहिले, मग स्वतःशीच तो काही बोलला. घईला काही शंका विचारतोय हे लक्षात आले. आणि मग त्याने रिहर्सल घेणे सुरु केले. ती कितीदा हे विचारुच नका. पूर्ण समाधान झाल्यावर दिलीपकुमारने म्हटले, चलो टेक करते है.

टेक-रिटेकची खेळी बराच काळ चालल्यावर अखेर एकदाचे घई व दिलीपकुमार या दोघांचेही समाधान झाले आणि दुपारचे जेवण व विश्रांती यांची वेळ झाली. दिलीपकुमारने सदैव याच गती व शैलीत काम केलेय. म्हणूनच ते दर्जेदार झाले आणि अशाच पध्दतीने काम करायचयं म्हणून आपल्या चित्रपटाची संख्या कधीही वाढवली नाही. सेटवरचा दिलीपकुमार हा असा आपल्याच संस्कृतीला जोपासलेला. ‘कर्मा’मध्ये दिलीपकुमारसोबत नूतन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी, पूनम धिल्लॉन, नसीरूद्दीन शाह, अनुपम खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. छोट्या छोट्या भूमिकेत अगणित कलाकार आहेत. अगदी तेव्हा शालेय वयात असणारी किशोरी शहाणेही नसिरच्या प्रेयसीच्या छोट्या भूमिकेत आहे. भरपूर चित्रीकरण स्थळांवर ‘कर्मा’ चित्रीत झालाय. पण भरपूर पेपर वर्क, मोठे युनिट व कलाकारांना योग्यरीत्या हाताळण्याची चतुराई या त्रिसूत्रीवर घई अनेकदा यशस्वी ठरला तसाच येथेही. ‘कर्मा’च्या सेटवर अशा अनेक प्रश्नांची जणू उत्तरेच मिळत गेली.
दिलीप ठाकूर