भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून फ्लिपकार्टने आता मनोरंजन क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे.

आजच्या ग्राहकांची मनोरंजनाची गरज लक्षात घेऊन व मोबाइल वापरकर्त्याला नजरेसमोर ठेवून कमीत कमी वेळेत अधिक उत्कंठा निर्माण करणारे, आकर्षक व इंटरॅक्टिव्ह कंटेंट फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आज उपलब्ध असलेल्या अन्य व्हिडिओ सेवांच्या तुलनेत वेगळी वाट चोखाळत फ्लिपकार्ट विस्ताराच्या आणि प्रयोगाच्या अपरंपार शक्यता असलेल्या, देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या आपल्या सर्वाधिक ग्राहकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्र यांचा मेळ साधत आहे.
येत्या काही महिन्यांत स्टुडिओ नेक्स्ट, फ्रेम्स आणि सिख्या प्रॉडक्शन्स यांसारख्या गुणवान आणि प्रतिष्ठित निर्मिती संस्थांसह फ्लिपकार्ट काम करणार असून विविध भाषांमधील विविध प्रकारचे अभूतपूर्व असे कंटेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. फरहा खान संचालित ‘बॅकबेंचर्स’ ही पहिली ओरिजिनल मालिका या महिन्यातच उपलब्ध होणार असून या मालिकेत भारतातील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटीज भूतकाळातील त्यांच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजळा देताना दिसतील.

फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स संदर्भात फ्लिपकार्टच्या ग्रोथ व मॉनिटायझेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश सिकारिया म्हणाले, “अत्यंत काळजीपूर्वक बनवलेल्या व निवडलेल्या साधन-साहित्याच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांच्या आयुष्यात सकारात्मक भर घालणे हे फ्लिपकार्टचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही काही महिन्यांपूर्वी आमची व्हिडिओ सेवा सुरू केली, त्यावेळी आमचे ध्येय स्पष्ट होते. इंटरनेटचा वापर करणाऱ्या, पण ई-कॉमर्सपासून काही कारणांनी लांब राहिलेल्या ग्राहकांना जोडण्यात भूमिका बजावण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. ही सेवा सुरू झाल्यापासून पहिल्या दोन महिन्यांतच ग्राहकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या प्रतिसादामुळेच प्रोत्साहित होत आम्ही आता आमच्या ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ हे नवे आकर्षण घेऊन आलो आहोत. ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात अंतर असून ते भरून काढण्यासाठी ग्राहकांना सहज उपलब्ध असेल, अशा, मोबाइल वापराला नजरेसमोर ठेवून बनवलेल्या कलाकृतींच्या निर्मितीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. पुरस्कारविजेत्या निर्मात्यांनी बनवलेल्या लघुकथांपासून बॉलिवुडमधील आघाडीच्या लोकप्रिय तारेतारकांचा सहभाग असलेल्या मनोरंजन कार्यक्रमांपर्यंत आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला आकर्षून घेईल असे काही ना खास मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. मोबाइलचा वापर नजरेसमोर ठेवून बनवलेल्या व्हिडिओंच्या युगात प्रवेश करत असताना देशभरातील लोकांच्या आशाअपेक्षांशी मेळ खाईल, अशा प्रकारच्या कलाकृती बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”