मुंबईत सहसा कार्यक्रम न करणारे ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाचा आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांसाठी चालून आली आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात आज म्हणजे दोन मार्च या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मजुमदार यांचे बासरीवादन आयोजित करण्यात आले आहे. प्रेसिडेन्सी कॉलेज (कोलकाता) अ‍ॅल्यूम्नी, मुंबई या संस्थेतर्फे होणारा हा कार्यक्रम जागतिक कीर्तीचे दिवंगत सतारवादक पं. रविशंकर यांना समर्पित करण्यात येणार आहे. पं. मजुमदार यांच्या बासरीवादनाव्यतिरिक्त पार्थ बोस यांचे सतारवादन आणि प्रोद्युत मुखर्जी यांचे तबलावादन ही या कार्यक्रमाची वैशिष्टय़े आहेत. पं. मजुमदार यांच्या एकल वादनानंतर बोस यांचे एकल सतारवादन होणार आहे. यानंतर या तिन्ही कलाकारांची एक अनोखी त्रिवेणी जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे.
जगभरात सर्वत्र पाच हजारांहून अधिक जाहीर कार्यक्रम करणारे पं. मजुमदार बासरीच्या अनेक प्रकारांसह तीन फूट लांबीची शंख बासुरी वाजवण्यात पारंगत आहेत. या अनोख्या बासरीमुळे मंद्र सप्तकांतील सुरांना वेगळाच उठाव मिळतो, असे मानले जाते. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.