अभिनेत्री प्रियांका चोप्राची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’ गेल्या काही दिवसांपासूनच चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेच्या कथानकावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. सोशल मीडियावर प्रियांचा चोप्रावर अनेकांनी टीकांचा भडीमार केला. या सर्व वादानंतर मालिकेचे निर्माते आणि प्रियांकाने जाहीर माफीदेखील मागितली. अशातच आता या वादावरून इस्लामविरोधी ट्विट केल्याने दुबईचा सेलिब्रिटी शेफ अडचणीत आला आहे. दुबईच्या एका प्रसिद्ध हॉटेलचे मुख्य शेफ अतुल कोचर यांना वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नोकरूवरून काढून टाकण्यात आलं आहे.

जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या रंग महल रेस्तराँचे मिशिलीअन स्टार शेफ अतुल कोचर यांनी ‘क्वांटिको’विरोधात ट्विटरवर राग व्यक्त केला. ‘गेल्या २००० वर्षांपासून इस्लामच्या दहशतीच्या सावटाखाली राहणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा तू सन्मान केला नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे,’ असं ट्विट कोचर यांनी केलं आणि या ट्विटवरूनच वाद सुरू झाला. इस्लामविरोधा ट्विट असल्याचा आरोप करत अनेकांनी त्यांना नोकरीवरून काढण्याची मागणी केली. तर सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली.

हा वाढता विरोध पाहता अखेर कोचर यांनी ट्विटरवर माफी मागितली. रागाच्या भरात मी तो ट्विट केल्याचं सांगत त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी मागितली. मात्र माफी मागितल्यानंतरही त्यांच्याविरोधात कारवाई करत रेस्तराँने त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी (MIT) प्राध्यापक रचत असल्याचे दाखवण्यात आले. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी परिषदेवर हल्ला करणार असल्याचे मालिकेचे कथानक होते. याच कथानकावरून भारतीयांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आणि संताप व्यक्त केला होता.