लेखनासाठी प्रसिद्ध असलेले सआदत हसन मंटो यांचा आज स्मृतिदिन आहे. मंटो यांच्या लेखनाने अनेकजण प्रभावित होतात. अशाच प्रभावित झालेल्या लोकांपैकी एक म्हणजेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनने त्याच्या अभिनय कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याने मंटो यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘मंटो’ या चित्रपटात सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारली होती. पण अशा आव्हानात्मक भूमिकेसाठी नवाजुद्दीनने फक्त १ रूपया मानधन घेतले होते.

नंदिता दास यांनी जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीला पटकथा सांगितली. तेव्हा नवाजुद्दीनला वाटले की मंटो यांचे विचार आणि त्याचे विचार सारखे आहेत. म्हणून स्वत:शी प्रामाणिक राहत त्याने फक्त १ रूपया मानधन घेतले होते. जेव्हा एखादी गोष्ट ही आपुलकीचा भास करून देते तेव्हा पैशांबद्दल विचार करणं चुकीचं आहे असं त्याने एका मुलाखतीत म्हटले होते.

२०१८ मध्ये नंदिता दास यांनी मंटो त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवला. या चित्रपटात नवाजुद्दीनने मंटोची भूमिका साकारली होती. नवाजुद्दीनने या भूमिकेला होकार देण्याआधी बराच वेळ घेतला. त्याला मंटो यांची भूमिका साकारता येईल का असा प्रश्न पडला होता. मात्र निर्मात्यांना नवाजुद्दीनवर पूर्णपणे विश्वास होता. नवाजुद्दीनने कोणालाही निराश केले नाही. नवाजुद्दीनने साकारलेल्या भूमिकेची चर्चा फक्त भारतात नाही तर परदेशात ही झाली होती. मंटो या भूमिकेतून नवाजुद्दीनने पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली होती.

मंटो यांनी समाजातल्या वास्तवावर रोखठोक भाष्य केले. त्यांच्या कथा, त्यांचे साहित्य हे आजही अनेकांना भुरळ घालतं. व्हिक्टर ह्युगो, मॉक्झिम गॉर्कि यांसारख्या विदेशी लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकं वाचली होती. त्यातली रोखठोक शैली त्यांनी आपल्या लिखाणातही आणली. सिनेसृष्टीसाठीही त्यांनी काही काळ लेखन केलं. नौशाद, अशोक कुमार यांच्याशी त्यांची चांगली दोस्ती होती. मंटो यांचा जन्म ११ मे १९१२ साली झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले आणि १८ जानेवारी १९५५ रोजी त्यांचे निधन झाले.