|| रेश्मा राईकवार

फार काही न बोलता, बरंच काही सांगून जाण्याची हातोटी फार कमी दिग्दर्शकांकडे असते. एखादी घटना जशी घडली आहे तशी चहूबाजूंनी मांडावी. त्यात काय चूक, काय बरोबर हा कै वार घेण्याचा अट्टहास धरायचा नाही. चित्रपट माध्यमातून जे घडलं आहे ते दाखवत, त्यावर पाहणाऱ्याला विचार करायला लावत योग्य तो बोध मनापर्यंत पोहोचवण्याचं कसब दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्याकडे आहे. ‘न्यूटन’मधून ते त्यांनी दाखवून दिलं आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेला ‘शेरनी’ हा एकाअर्थी पूर्णपणे वेगळा आणि ज्यावर कोणी सहजी भाष्य करू धजावत नाही अशा आशयाचा चित्रपट आहे. जंगलाच्या शांततेत दडलेल्या भयाण वास्तवाची जाणीव करून देणारा हा चित्रपटही त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतच चित्रित के ला आहे हे विशेष.

जंगलातील अधिवास कोणाचा? त्याच्यावर अतिक्रमण करणारं कोण? या वास्तवाची जाण असूनही प्राण्यांनी आपल्यावर हल्ला चढवला. त्यांना मारून टाका… ही एकच बोंबाबोंब के ली जाते. प्राणी आपले शत्रू नाहीत, ते आहेत तर निसर्गाचा समतोल आहे. त्यांचा अधिवास सांभाळून, त्यांच्याशी मैत्री करून आपण राहिलं पाहिजे, अशी जनजागृती गावात के ली जाते. तेव्हा अडाणी गावकऱ्यांना ती पटत नाही असं नाही. मात्र वन्य प्राण्यांविषयी विशेषत: वाघ आणि बिबट्यांबद्दल असलेली त्यांच्या मनातील दशहत मिटवण्याऐवजी ती कशी वाढेल?, याचाच प्रयत्न अनेक घटकांकडून के ला जातो. आणि तसे करण्यासाठी प्रत्येकाची स्वार्थी कारणंही वेगवेगळी आहेत. विद्या ही वन अधिकारी म्हणून नव्याने गावात रुजू झाली आहे. गावात नरभक्षक वाघिणीचे हल्ले वाढले आहेत. या वाघिणीला आणि तिच्या दोन बछड्यांना सुरक्षित पकडून राष्ट्रीय उद्यानात सोडण्याची जबाबदारी विद्या आणि तिच्या सहकाऱ्यांवर आहे. ही जबाबदारी सोपी नाही. या वाघिणीच्या जंगलातून गावात येण्याजाण्याच्या सवयी, वेळा या सगळ्यांचा अभ्यास वन अधिकाऱ्यांकडून के ला जातो. यासंदर्भात वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक नूरानींसारख्या व्यक्तींची साथ त्यांना मिळते. मात्र हरएक प्रयत्न करूनही वाघिणीला पकडण्यात राजकारण्यांपासून भ्रष्ट वन अधिकाऱ्यांपर्यंतचे स्वार्थी मनसुबे अडथळे ठरतात. रोखठोक स्वभाव असणाऱ्या विद्यासारख्या अधिकाऱ्याचाही या बजबजपुरीत नाहक बळी जातो.

माणूस आणि प्राणी यांचे सहअस्तित्व पटवून देऊन निसर्गाचा समतोल सांभाळणं शक्य आहे, मात्र मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायची सवय असलेल्या राजकारण्यांना हे मैत्र नको आहे. वाघाला मारून गावकऱ्यांची भीती घालवण्याच्या नावाखाली राजकारण्यांना त्यांची मतं जिंकायची आहेत. शिकारीची हौस असलेल्या टिपू भैयासारख्या माणसांना अमुक एक नरभक्षकांना मारल्याचे अभिमानाने मिरवायचे आहे. आणि हा सगळा गोंधळ आपापल्या वनक्षेत्रात झाला तर सत्ताधाऱ्यांचे बोल ऐकू न नोकरी धोक्यात येऊ नये म्हणून धडपडणारे नांगिया, बन्सल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना मुळातच वन्यजीवांविषयी काही देणेघेणे नाही. अशा परिस्थितीत हा माणूस आणि प्राणी यांच्यातला संघर्षच उरलेला नाही, यावर दिग्दर्शकाने सहज बोट ठेवले आहे. एकाच घटनेतून अनेक मुद्दे मांडण्याचा मोह इथेही दिग्दर्शकाला आवरलेला नाही. त्यामुळे विद्याच्या घरच्यांची मानसिकता, मूल हवं हा आग्रह, एकू णच सरकारी व्यवस्थेतली उदासीनता अशा अनेक गोष्टींचे कडबोळे यात आहे. पण त्यामुळे मूळ मुद्दा झाकोळला जात नाही, उलट वन अधिकाऱ्यांच्या कामांचे अधिक बारकाईने चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. उत्तम कथेला उत्तम कलाकारांच्या अभिनयाची जोड मिळाली आहे. विद्याच्या भूमिके त अभिनेत्री विद्या बालनची निवड चपखल ठरली आहे. त्यांच्यातलीच एक वाटणारी आणि तरीही वेगळा आब असलेल्या वन अधिकाऱ्याच्या भूमिके त विद्या बालन नेहमीप्रमाणे भाव खाऊन गेली आहे. किं बहुना आजवरच्या तिच्या अनेक भूमिकांमध्ये ही अत्यंत संयत, शब्दबंबाळ संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणारी विद्या पाहायला मिळते. विद्या आणि प्राध्यापक  नूरानी यांच्या भूमिके त अभिनेते विजय राज यांचा अचूक वापर करून घेण्यात आला आहे. त्यांचा वावर या चित्रपटाला वेगळा आयाम देऊन गेला आहे. नीरज काबी, शरत सक्सेना अशा चांगल्या कलाकारांबरोबरच पुरुष आणि महिला वनअधिकाऱ्यांच्या भूमिके तील नव्या चेहऱ्यांनीही चमकदार कामगिरी के ली आहे. ज्योतीसारख्या काही गावकऱ्यांच्या छोट्या-मोठ्या भूमिकाही लक्षात राहतात. नावातच शेरनी असल्याने ‘वाघ’दर्शन हा यातला आपल्याला सुखावणारा भाग आहे. जंगलातील भयाण शांतता ही आपल्याला एरव्ही सहन होत नाही, इथे कॅ मेरा जसा फिरतो तशी आपली नजरही वाघ शोधत राहते. आणि जंगलातल्या त्या शांततेत लपलेलं प्राण्यांचं, स्वार्थ आणि अहंकारापुढे असाहाय्य ठरलेल्या माणुसकीचं रुदन आपल्याला स्पष्टपणे ऐकू  येतं.

शेरनी

दिग्दर्शक – अमित मसुरकर

कलाकार – विद्या बालन, नीरज काबी, विजय राज, शरत सक्सेना, ब्रिजेंद्र काला, इला अरुण.