भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत डान्स रिआलिटी कार्यक्रम ‘झलक दिखला जा’ च्या सहाव्या पर्वात सहभागी होणार आहेत. ५३ वर्षीय माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचा होकार ही दिला असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात एकूण १२ स्पर्धक असणार आहेत.
“आम्ही कार्यक्रमात काही क्रिकेटपटूंनाही सहभागी करुन घेणार आहोत. श्रीकांत यांच्याशी याबाबत विचारणा केली होती आणि त्यानुसार कार्यक्रमात एक क्रिकेटपटू असेल. या कार्यक्रमात प्रत्येक वेळेस क्रिकेटर किंवा राजकारणी याक्षेत्रातील व्यक्तींना सहभागी करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असतो” असे कलर्स टेलिव्हीजन वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याआधी ‘झलक दिखला जा’ या डांन्सिंग रिआलिटी कार्यक्रमातून श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, बॉक्सर अखिल कुमार, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ, फूटबॉलपटू भूटीया आणि भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा या खेळाडूंनी आपली नृत्यकला आजमावून पाहीली आहे.