News Flash

नाटय़चौकाराची पर्वणी!

येत्या काही दिवसांमध्येच या नाटय़चौकाराची पवर्णी साऱ्यांनाच अनुभवता येणार आहे

‘दिल तो बच्चा है जी!’

मराठी रंगभूमीला मरगळ आली आहे, फक्त विनोदी नाटकांचीच लाट आहे, वस्तू आणि सेवा करामुळे निर्मात्यांच्या काळजात धस्स झालं आहे, अशा विविध गोष्टी ऐकायला मिळतात. सध्याच्या घडीला मराठी रंगभूमीवर नाटक आणण्यासाठी पोषक वातावरण नाही, असंही म्हटलं जातं आहे. पण तरीदेखील रंगभूमीवर नवीन नाटकं येण्याची संख्या काही रोडावताना दिसत नाही. कारण प्रत्येकाला विश्वास आहे तो नाटकाच्या संहितेवर, विचारांवर आणि कसदार अभिनयावर. त्यामुळेच लवकरच चार नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ अशी दमदार नाटकं लिहिणारे विवेक बेळे ‘कुत्ते कमिने’ हे नवं कोरं नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. पहिल्यांदाच त्यांच्या नाटकाला साज चढणार आहे तो चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाचा. सध्या ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का?’ हे गाणं तुफान गाजतंय आणि याचाच फायदा उचलत लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार ‘सोनू तुला भरोसा नाही का?’ या नाटकानिशी नवा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही मालिका साऱ्यांनाच परिचयाची. या मालिकेतील लेखक अक्षय जोशी लिखित ‘दिल तो बच्चा है जी!’ हे नवीन नाटक रंगभूमीवर येत असून प्रसाद खांडकेकर याचे दिग्दर्शन करत आहे. तर ‘टिळक आणि आगरकर’ हे ऐतिहासिक नाटक पुन्हा एकदा तब्बल २५ वर्षांनी रंगभूमीवर आलं आहे.

विवेक बेळे आणि चंद्रकांत कुलकर्णी हे ‘कुत्ते कमिने’ नावाचं नाटक घेऊन येत असल्याचे ऐकल्यावर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण या दोघांचीही धाटणी या शीर्षकाला साजेशी नक्कीच नाही, त्याचबरोबर हे दोघे पहिल्यांदाच या नाटकाच्या माध्यमातून एकत्र येत असल्यामुळे या नाटकाविषयी साऱ्यांनाच उत्सुकता आहे. या  नाटकाचा  विषय अजूनही गुलदस्त्यात आहे. पण विनोदी अंगाने जाणारा आणि प्रत्येक कुटुंबाला आपलासा वाटणारा, हा प्रयोग असेल असे समजते आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या तब्बल २० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.

भरोसा अर्थात विश्वास या विषयावर भाष्य  करणारं  नाटक म्हणजे  ‘सोनू तुला भरोसा नाही का?’  .. धम्माल विनोदी अंगाने जाणारे हे नाटक कुणाचं नाव न घेता चिमटा काढणारं, कोपरखळ्या मारणारं असेल. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन संतोष पवार करत असून युवा कलाकारांना घेऊन ते बसवण्यात आलं आहे. आतापर्यंत ‘जाणून-बुजून’ पासून नव्या कलाकारांना पवार यांनी नेहमीच वाव दिलेला आहे. त्यामुळे सळसळत्या उत्साहात हे नाटक सादर होईल आणि प्रत्येकाच्या मनाला ते भिडेल, असा विश्वास पवार यांना आहे.

विवाहित जोडप्यांवर आधारित नवीन नाटक म्हणजे ‘दिल तो बच्चा है जी!’ ही गोष्ट तीन जोडप्यांची, तीन मित्रांची आणि त्यांच्या बायकांची. जोडप्यांमध्ये विसंवाद पाहायला मिळतो. पण हा विसंवाद प्रत्येकाला दूर करायचा असतो. लग्नानंतरही एका मुलीबाबत हे तीन मित्र चर्चा करतात. त्या चर्चेमुळे त्यांच्यातही विसंवाद होतो. पण जेव्हा या साऱ्यांमध्ये योग्य संवाद साधला जातो तेव्हा मानगुटीवर बसलेलं संशयाचं भूत निघून जातं, अशी गंमत या नाटकामध्ये पाहायला मिळणार आहे.आताच्या पिढीतील प्रत्येकाला हे नाटक आपलंसं करेल, असं खांडकेकर यांना वाटतं. चार वर्षांनी सर्वाचा लाडका ‘पॅडी’ म्हणजेच पंढरीनाथ कांबळी रंगभूमीवर या नाटकाद्वारे पुनरागमन करणार आहे.

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, या व्यक्तींची माहिती महाराष्ट्रात तरी कुणाला सांगावी लागणार नाही. पण त्या दोघांमधले मैत्रीपूर्ण संबंध, त्यांची राजकारण आणि समाजकारणाविषयीची मतं ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकात पाहायला मिळणार आहेत.

विश्राम बेडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे नाटक मैत्रीच्या बंधावर भाष्य करताना सामाजिक आणि राजकीय विषयांवरही आपले विचार व्यक्त करतं. आपण समाज बदलला असं म्हणतो, पण तेव्हाच्या समस्याही अजून कायम आहेत, मानसिकतेतही बदल झालेला नाही. त्यामुळे समाज बदलला आहे, म्हणजे नेमकं काय यावर हे नाटक भाष्य करतं. सुनील जोशी यांनी या वेळी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून सध्याची पिढी ही समाजमाध्यमांवर जास्त पाहायला मिळते, पण त्यांना सकस विचारांचं नाटक पाहायला मिळावं, हा उद्देश मनाशी बाळगत या नाटकाचे पुनरुज्जीवन करण्यात आलं असल्याचं त्यांना वाटतं.

येत्या काही दिवसांमध्येच या नाटय़चौकाराची पवर्णी साऱ्यांनाच अनुभवता येणार आहे. ही नाटकं किती चालतील, हे तुम्ही सुजाण प्रेक्षक ठरवालच, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 2:21 am

Web Title: four marathi drama coming to meet audience
टॅग : Marathi Drama
Next Stories
1 आत्मकैदेची गोष्ट
2 काळजाचा ठोका चुकवणारी ‘रुद्रम’
3 ‘मनिकर्णिका’ चित्रपटात सोनू सूदचा प्रवेश
Just Now!
X