‘फोर मोअर शॉट्स प्लिज’ या वेब सीरिजमुळे प्रकाश झोतात आलेली मानवी गगरू हे डिजिटल विश्वातील एक ओळखीचे नाव आहे. अॅमेझॉन प्राइमच्या या डिजिटल शोमधील मानवीची सिद्धी पटेल ही भूमिका घराघरांत चर्चेचा विषय बनली आहे. चार तरुण मुली, शहरी महिलांमधील गुंतागुंतीचे नाते, वर्क-लाइफ बॅलन्स, महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणारे दडपण अशा अनेक विषयांवर ही सीरिज आधारित आहे.

‘फोर मोअर शॉट्स प्लिज’च्या यशानंतर आता मानवी प्रेक्षकांना आणखीन एक सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहे. झी५च्या ‘३७७ अब नॉर्मल’ या सिनेमात ती झळकणार आहे. फारूक कबीर या अनोख्या नावाच्या डिजिटल फिल्मचे दिग्दर्शन आणि सहनिर्मिती करत असून त्यांच्यासोबत आदित्य नारायण सिंग हे निर्माते आहेत. श्री जगन्नाथ एंटरटेनमेंट आणि स्पायडर्स वेब प्रोडक्शन्स या बॅनर्स खाली या कलाकृतीची निर्मिती होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘झी५ च्या आगामी प्रोजेक्टसाठी मानवीची निवड करण्यात आली असून त्यात ती एक रंजक भूमिका साकारताना दिसणार आहे. याचा विषय काहीसा गंभीर असला तरी त्यातील संदेश देताना प्रेक्षकांचे मनोरंजन होईल एवढे मात्र नक्की’. मानवीसोबतच या डिजिटल फिल्ममध्ये तन्वी आझमी, मोहम्मद आयुब, शशांक अरोरा आणि कुमुद मिश्रा यांसारख्या गुणी कलाकारांचा समावेश आहे. ‘या सिनेमाबद्दल समजल्यावर मला हा सिनेमा आणि त्यातील हा भाग साकारायचा आहे असे मनाशी ठरवले होते. तेव्हा मी कथा वाचली नव्हती तरी ही महत्त्वाची फिल्म असून त्यात मला काम करायचे होते. मी समानतेबद्दल कायम आग्रही असताना लैंगिकता हा त्याचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे ही कलाकृती नाकारण्याचा कधी प्रश्नच नव्हता!’ असे मानवी सांगते.