अॅमेझॉन प्राइमवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या १७ एप्रिलपासून हा नवीन सिझन अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

पत्रकार, वकील, जिम प्रशिक्षक आणि श्रीमंताघरची लेक अशा चौघींची ही कथा आहे. या चौघी अपघाताने एकेदिवशी एका उच्चवर्गीय बार/पबमध्ये भेटतात. वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या या चौघींच्या आयुष्यात त्या तीन वर्षांत घडलेल्या घटना हे या मालिकेचं कथानक आहे. त्यांनी सन्मान, आदर, समाजमान्यता, प्रेम, लैंगिक सुख, आनंद मिळवण्यासाठी केलेली धडपड यात आहे. मुक्तपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चौघींना काय काय अडचणी येतात हे येथे मांडण्याचा प्रयत्न होतो.

आणखी वाचा : ‘काही शब्द ब्रह्मांडातून गायबच झालेत’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

सयानी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, लिसा रे, प्रतिक बब्बर, मिलिंद सोमण आणि इतर कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुपुर अस्थानाने या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे. दुसऱ्या सिझनमध्ये इस्तांबूल शहरात त्या चार मैत्रिणींची पुन्हा भेट कशी होते, ते दाखवण्यात येणार आहे.