‘अवेनस्डे’ आणि ‘स्पेशल २६’ सारख्या चित्रपटानंतर दिग्दर्शक नीरज पांडेने आपला मोहरा चरित्रपटांकडे वळवला. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आणि धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंग राजपूत अशी चांगली तयारी झाली. तरी या चित्रपटाबद्दल फारसे काही तपशील बाहेर आले नव्हते. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’साठी सुशांतने चित्रीकरणाला सुरुवातही केली. मात्र, सध्या या चित्रपटाची आणि सुशांतच्या ‘धोनी’ अवताराची एवढी चर्चा सुरू आहे की या चित्रपटाच्या सहनिर्मितीसाठी ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’सारखी नामांकित निर्मिती संस्था पुढे सरसावली आहे.
सुशांतने साकारलेल्या ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नसला तरी तो साकारत असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या भूमिके बद्दल मात्र चित्रपट वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. धोनीच्या टीममधल्या इतर नावाजलेल्या खेळाडूंच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिग्दर्शक नीरज पांडे आणि टीमने या चित्रपटाबद्दलचे तपशील बाहेर पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मात्र, तरीही चित्रपटाबद्दल लोकांच्या मनातली उत्सुकता इतकी वाढली आहे की या चित्रपटाच्या निर्मितीचा भाग नाही होता आले तर कमीतकमी सहनिर्मितीत सहभाग असावा या हेतूने पुढे आलेल्या ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ने या चित्रपटाचे जगभरात वितरण करण्याचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत सुशांतही कमालीचा उत्साहात आहे. एरव्ही हयात नसलेल्या लोकांचे चरित्रपट साकारणे ही तुलनेने सोपी गोष्ट आहे. पण, जी व्यक्ती हयात आहे, लोकांसमोर वावरते आहे, त्याची भूमिका साकारणे अजिबात सोपे नाही, असे सुशांतने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. कॅ प्टन म्हणून महेंद्रसिंग धोनी लोकांचा प्रचंड आवडता आहे. त्याचा जन्म कुठला, त्याचं लहानपण कसं गेलं, त्याचं शिक्षण या गोष्टीही इंटरनेटच्या मदतीने अनेकांना माहिती झाल्या आहेतच. मात्र, तो बोलतो कसा? तो अमुकएका पद्धतीनेच बॅट उलचतो, त्याची खेळण्याची-वागण्याची शैली ही कित्येकांना तोंडपाठ आहे. त्यामुळे पडद्यावर धोनी साकारताना त्याच्या त्या गोष्टी तंतोतंत साकारणं हे मोठं आव्हान असल्याचं सुशांतने सांगितलं. आता धोनीच्या पत्नीची साक्षीची भूमिको कोण साकारणार इथपासून अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मात्र, फॉक्सने जबाबदारी घेतली असल्याने चित्रपटाच्या निर्मितीपासून ते वितरणापर्यंत सगळ्याच बाबतीत तो भव्य झाला आहे.