महाकाव्य महाभारतावर आधारित चित्रपट साकारण्याचा आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुमारे १ हजार कोटींहून अधिक बजेट असलेल्या या चित्रपटात आमिर कृष्णाची भूमिका साकारत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याच गोष्टीवरून सध्या ट्विटरवर ‘महाभारत’ सुरू झालं आहे. फ्रॉन्सवा गॉटीयार Francois Gautier या फ्रेंच पत्रकाराने आमिर मुस्लिम असतानाही महाभारतावर आधारित चित्रपटात कृष्णाची भूमिका का साकारावी, असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या या प्रश्नावर जावेद अख्तर यांनी ट्विटरवर सडेतोड उत्तर दिलंच, पण त्याच्या ट्विटवर अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

‘आमिर मुस्लिम असतानाही त्याने पवित्र आणि प्राचीन अशा महाभारतावर आधारित चित्रपटात भूमिका का साकारावी? पुरोगामी विचारांच्या नावाखाली मोदींच्या भाजपाचीही विचारसरणी काँग्रेसप्रमाणेच होतेय? मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात मुस्लिम कोणा हिंदू कलाकाराला भूमिका साकारण्याची परवानगी देतील?’, असा सवाल उपस्थित करत फ्रॉन्सवा गॉटीयारने सर्वांचं लक्ष वेधलं. त्याच्या या ट्विटचं उत्तर देत जावेद अख्तर यांनी लिहिलं, ‘नीच माणसा… फ्रान्समध्ये या महाकाव्यावर आधारित पीटर ब्रूक्सच्या निर्मितीत साकारलेली कलाकृती तू पाहिली नाहीयेस का? आमच्या देशात असे विकृत विचार पसरवण्यासाठी कोणती विदेशी एजन्सी पैसे देते हे मला माहित करुन घ्यायचं आहे.’

वाचा : ‘महाभारत’ घडवण्यासाठी आमिरची साथ देणार अंबानी?

या ट्विटनंतर अनेकांनीच गॉटीयारला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तर ट्रोल करणाऱ्यांनाही त्याने प्रत्युत्तर दिलं. ‘आमिरने महाभारतावर आधारित चित्रपटावर कृष्णाची भूमिका साकारण्यावर मी आक्षेप घेतला, तर अनेक हिंदूंनी मला ट्रोल केलं. मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात मुस्लिम कोणा हिंदू कलाकाराला भूमिका साकारण्याची परवानगी देतील का? त्याचप्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये एखादा मुस्लिम व्यक्ती येशू ख्रिस्तांची भूमिका साकारू शकणार का?,’ असा प्रश्न त्याने उपस्थित केला.