गेल्या वर्षभरामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडला अनेक नवे चेहरे मिळाले. विशेष म्हणजे या नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांची विशेष मन जिंकून घेतली. त्यामुळेच त्यांच्याकडे सध्या अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये काही असे कलाकार आहेत जे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या ९ जोड्यांविषयी-

१. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर –
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. सध्या कलाविश्वामध्ये या दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांनी एकदा तरी स्क्रीन शेअर करावी अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हे दोघंही लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२. हृतिक रोशन आणि वाणी कपूर –
अभिनेता हृतिक लवकरच ‘वॉर’ या आगामी चित्रपटात झळकणार असून अभिनेत्री वाणी कपूर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

३ सारा अली खान आणि वरुण धवन –
नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली आणि गोविंदा रातोरात सुपरस्टार विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. त्यानंतर या चित्रपटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना आजमावता येणार आहे. ‘कूली नंबर १’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सारा अली खान आणि वरुन धवन स्क्रीन शेअर करणार आहेत.

४. दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर –
‘बागी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानी लवकरच अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर –
बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंडबरोबर हळूहळू रिमेकचाही ट्रेंड सुरू झाला आहे. यातच चर्चा होती ती बहुप्रतिक्षित अशा ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाची. १९७८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट हा बॉलिवूडमधल्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक चित्रपट होता. या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

६. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन-
२००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात सारा अली खान आणि कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘लव्ह आज कल २’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० प्रदर्शित होणार आहे.

७ राजकुमार राव आणि जान्हवी कपूर –
‘रुह अफ्जा’ या भयपटामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

८. कियारा आणि कार्तिक आर्यन –
२००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भुलभुलैय्या २’मध्ये कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ३१ जुलै २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.