२ ऑगस्ट हा दिवस दर वर्षी ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्य ते सेलिब्रेटी असणारा प्रत्येक जण आपापल्या परीने हा दिवस साजरा करतो. आपल्या बॉल१वूडमध्ये ‘दोस्ती’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. अनेक चित्रपटांतून ही दोस्ती/मैत्री पाहायला मिळाली आहे. बॉलीवूडमधील ‘मैत्री’वर असलेल्या गाण्यांचा हा प्रवास ‘शोले’मधील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’पासून ते अलीकडच्या ‘दिल चाहता है’ या शीर्षकगीतापर्यंत झाला आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप दिनाच्या निमित्ताने बॉलीवूडच्या चित्रपटांमधील गाजलेल्या काही मैत्री गाण्यांचा आढावा..
हिंदूी चित्रपटांमधून दोन मित्रांची गोष्ट अनेकदा आणि वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळाली आहे. दोन मित्रांच्या या मैत्रीची ओळख त्या त्या चित्रपटांमधून गाण्यांमधून प्रेक्षकांना झाली आहे. एक गरीब आणि एक श्रीमंत मित्र, दोस्तीसाठी एकमेकांवरून जीव ओवाळून टाकण्याची तयारी किंवा प्रेमाचा केलेला त्याग अशा मसाल्याची फोडणी या सगळ्याला दिलेली असते. सोबत तोंडी लावण्यासाठी दोस्तीचे महत्त्व सांगणारे एखादे गाणेही टाकलेले असते. हिंदीत असा फॉम्र्युला आणि गाणी हिट झाली आहेत. ‘दोस्ती’ हा शब्द उच्चारला की, पटकन डोळ्यासमोर आणि ओठावर येणारे पहिले गाणे म्हणजे ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटातील. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेले ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ असे म्हणणारे ‘जय-वीरु’ आजही लोकप्रिय आहेत. दोन मित्रांची घट्ट मैत्री असेल तर त्यांना याच नावाने ओळखले किंवा चिडवले जाते. मन्ना डे आणि किशोरकुमार यांच्या आवाजातील हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित झालेले ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ हे गाणेही जुने असले तरी ‘मैत्री’चे यथार्थ वर्णन करणारे आहे. ज्या ‘जंजीर’ चित्रपटाने अमिताभ बच्चन याला ‘अँग्री यंग मॅन’ ही उपाधी मिळवून दिली त्या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेले ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ हे गाणे मन्ना डे यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे आहे. आजच्या काळातही गाण्यांच्या भेंडय़ा खेळताना हे गाणे आवर्जून म्हटले जाते. ‘नमकहराम’ या चित्रपटात असलेले आणि आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले ‘दिये जलते है और फूल खिलते है’ हे गाणे राजेश खन्ना अमिताभसाठी म्हणतो. ‘याराना’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्यावरील ‘तेरे जैसा यार कहाँ, तेरा मेरा याराना’ हे गाणेही ‘मैत्री’ विषयावरील एक हिट ठरलेले गाणे आहे. ‘दोस्ती’ याच नावाचा एक हिंदी चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. कृष्णधवल रंगात असलेल्या या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली होती. यातील ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’ हे गाजलेले गाणे. अभिनयसम्राट दिलीपकुमार आणि ‘संवाद’फेकीसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते राजकुमार हे सुभाष घई यांच्या ‘सौदागर’ चित्रपटात एकत्र आले होते. या चित्रपटातील दोघांवर चित्रित झालेले ‘इमली का बुटा’ हेही गाणे रसिकांच्या स्मरणात आहे. ‘मैने प्यार किया’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘आया मौसम दोस्ती का’ हेही ‘दोस्ती’वरील आणखी एक गाणे.
‘दोस्ती’ विषयावरील गेल्या काही वर्षांत
प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील काही गाणी
प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन व जॉन अब्राहम या तिघांच्या मैत्रीचे ‘दोस्ताना’ चित्रपटातील ‘जाने क्यो’.
‘यारो दोस्ती बडी हसीन है ये ना हो तो क्या फिर बोलो जिंदगी है’ हे ‘यारो-रॉकफोर्ड’ चित्रपटातील गाणे.
आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्या ‘थ्री इडियट’मधील ‘जाने नही देंगे तुझे’.
आमिर खान, अक्षय खन्ना व सैफ अली खान यांच्यावरील ‘दिल चाहता है’ चित्रपटातील शीर्षकगीत.
‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटातील ‘अरे यारो, मेरे प्यारो’.