News Flash

VIDEO : ऑनस्क्रीन धोनीचं आलिशान घर पाहिलं का?

सुशांतने स्वत: त्याच्या घराची सफर घडवली आहे

सुशांत सिंह राजपूत

सेलिब्रिटींच्या जीवनशैलीविषयी नेहमीच चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं आहे. ते कुठे राहतात, कसं आयुष्य जगतात या साऱ्यासोबतच सेलिब्रिटींची घरं नेमकी असतात तरी कशी हा प्रश्नसुद्धा चाहत्यांच्या मनात घर करत असतो. याच प्रश्नांची उत्तरं आता चाहत्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. कारण, एशियन पेंट्सच्या ‘वेअर द हार्ट इज’ या वेब शोच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटींच्या घराची सफर घडवणारा हा शो सध्या वेब विश्वात चर्चेचा विषय ठरतोय. या शोच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सेलिब्रिटीच त्यांच्या घराची ओळख करुन देत आहेत.

अशा या शोच्या नव्या भागात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. ऑनस्क्रीन महेंद्रसिंह धोनी साकारणाऱ्या सुशांतनेच त्याच्या घराची सफर सर्वांना घडवली असून, लिव्हिंग रुमपासून ते स्टडीरुपमपर्यंत आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्याविषयीची माहिती दिली आहे. मुंबईतील आपल्या घरामध्ये सुशांतने त्याचं असं एक वेगळं विश्व थाटलं आहे.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

चित्रीकरणाच्या निमित्ताने बुडापेस्टमध्ये असतानाच सुशांतने या आलिशान घराचा व्हिडिओ पाहिला अन् पाहताक्षणीच त्याने हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या घराची ओळख करुन देत असताना, त्याविषयी बोलत असताना कोणा एका जवळच्या व्यक्तीविषयीच आपण बोलत असल्याची आपुलकीची भावना त्याच्या आवाजातून व्यक्त होत होती. सुशांतच्या घरातून मुंबईचा सुरेख समुद्रकिनारा दिसतो, त्यासोबतच या शहराचं दृश्यही त्याच्या घरातून पाहायला मिळतं. बऱ्याच गोष्टींचा संग्रह असणाऱ्या या घरात त्याने काही अशा गोष्टीही ठेवल्या आहेत, ज्याची कोणी अपेक्षाही केली नसेल. ती गोष्ट म्हणजे दुर्बिण. अतिशय मोठी आणि प्रोफेशनल दुर्बिण त्याने आपल्या घरात ठेवली आहे, जिच्या माध्यमातून तो इच्छा असेल तेव्हा आणि निरभ्र आकाश असेल तेव्हा चंद्र, ताऱ्यांना न्याहाळतो. त्याने या दुर्बिणीला ‘टाईम मशिन’ असं नावही दिलं आहे. अशा या घरात शक्य तितका वेळ व्यतीत करत पुन्हा पुन्हा स्वत:ला भेटण्याची संधी सुशांत कधीच सोडत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 11:16 am

Web Title: from living room to study watch bollywood actor sushant singh rajput lavish apartment in mumbai watch video
Next Stories
1 चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रीवरच कुत्रा पिसाळला अन्…
2 आपण यांना ओळखलंत का?
3 रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रवि किशनचे असे बदलले नशीब
Just Now!
X