बॉलिवूड अभिनेत्री विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या कपड्यांवर आणि लूकवरच अनेकांच्या नजरा खिळतात. प्रत्येक वेळी सेलिब्रिटी फॅशन डिझायनरने डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये कलाकार मंडळी दिसतात. मुख्य म्हणजे सलग विविध कार्यक्रमांना हजेरी लावणारे हे सेलिब्रिटी नेहमीच नवनवीन ड्रेसमध्ये पाहायला मिळतात. एखादा ड्रेस किंवा साडी, सूट पुन्हा एखाद्या समारंभात वापरण्याला प्राधान्य देणारे चेहरे अगदी नसल्यातच जमा. पण, अभिनेत्री रिचा चड्ढा मात्र यात एक नवा पायंडा पाडत आहे. तिच्या इन्स्टाग्राम पाहता हे लगेचच लक्षात येतं.

मित्राच्या म्युझिक अल्बमच्या लाँचसाठी रिचाने विशेष उपस्थितीत लावली होती. त्यावेळचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘सेल्फ स्टाईल्ड…’, असे म्हणत तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये आपण हा ड्रेस पुन्हा वापरत असल्याचेही स्पष्ट केले. फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली, ‘फुकरे रिटर्न्स’मधील रिचाच्या परफॉर्मन्सची दाद दिली, तर कोणी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. पण, एका युजरने मात्र रिचाच्या ड्रेसकडे लक्ष वेधले आणि एक प्रश्न उपस्थित केला. ‘एकच ड्रेस पुन्हा वापरणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधणाऱ्या प्रसारमाध्यमांना ही चपराक आहे का?’, असा प्रश्न त्या युजरने विचारला.

https://www.instagram.com/p/BcrqlSCh9ys/

त्या कमेंटला उत्तर देत रिचाने लिहिले, ‘या गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवणे मला पटत नाही. कपडे एकदाच वापरुन ते फेकून देणे हे योग्य नाही.’ नेहमीच आपल्या ठाम भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचाच्या या उत्तराने सेलिब्रिटींवर टीका करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या असाव्यात. एखाद्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी त्याच कपड्यांमध्ये दिसले तर त्यावरुन होणारी चर्चा, सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग या साऱ्याचे प्रमाण आता तरी थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास, कपड्यांच्या बाबतीत इतक्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडणाऱ्या रिचाची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…