वाढत्या लॉकडाउनमुळे सिनेउद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले आहे. परिणामी कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या नुकसानातून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी विनंती द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने केली आहे. त्यांनी अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करण्याची संमती मागितली आहे.

अवश्य पाहा – “भीतीचा खेळ थांबवा लॉकडाउन उठवा”; अभिनेत्याची सरकारकडे मागणी

FWICEने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण करण्याची परवानगी मागितली आहे. “लॉकडाउनमुळे अनेक प्रकल्प अर्ध्यावरच थांबले आहेत. प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कृपया पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण करण्याची संमती द्यावी. आम्ही मोजक्या कर्मचाऱ्यांसोबत पुरेशी काळजी घेऊन बंद स्टुडिओत काम करु.” अशा आशयाचा मजकुर या पत्रामध्ये लिहिला आहे.

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

यापूर्वी असाच एक विनंती अर्ज तामिळनाडू सरकारकडे करण्यात आला होता. या अर्जावर विचार करुन सरकारने पोस्ट प्रोडक्शनला परवानगी दिली होती. मात्र यादरम्यान केवळ १५ लोक सेटवर हजर राहू शकतात. या मंडळींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य असेल. पोस्ट प्रोडक्शनमध्ये चित्रीकरण करता येणार नाही. मात्र चित्रीकरण झाल्यानंतर केले जाणारे स्पेशल इफेक्ट, डबिंग, गाण्यांचे रेकॉर्डिंग, एडिटिंग ही कामे करता येतील. अशा अटी घालण्यात आल्या होत्या.