बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सनी देओल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. सनी देओल यांच्या भाजपा प्रवेशाविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. यामध्ये सनी देओल यांनी कलाविश्व सोडून राजकारणाची वाट का धरली असे प्रश्न अनेकांनी चाहत्यांना पडले आहेत. या प्रश्नांवर चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

अनिल शर्मा यांनी सनी देओलसोबतचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “५६ इंचाची छाती आता ६२ इंचाची झाली आहे”, असं कॅप्शन अनिल शर्मा यांनी या फोटोला दिलं आहे. त्यासोबतच सनी यांनी भाजपामध्ये प्रवेश का केला याचं उत्तरही दिलं आहे.

“राजकारण वाईट आहे, मात्र तरीदेखील स्वच्छ प्रतिमा आणि सरळमार्गी असलेले सनी देओल यांनी राजकारणात प्रवेश का केला असा प्रश्न लोक विचारत आहेत. मात्र जर प्रत्येक व्यक्तींने राजकारण वाईट आहे असा विचार केला आणि त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तर या वाईट राजकारणाचा अंत कधी होणार ? राजकारणातील वाईट प्रवृत्ती नष्ट करायच्या असतील तर स्वच्छ प्रतिमा आणि चांगल्या विचारांच्या माणसांनी या राजकराणात प्रवेश केलाच पाहिजे. त्यामुळे सनी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला”, असं अनिल शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र या चित्रपटानंतर सनी यांनी फार थोड्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि कलाविश्वामधील त्यांचा वावर कमी झाला. आता त्यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला असून पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.