सिनेसृष्टीत अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाविरोधात सध्या मोठय़ा प्रमाणावर आवाज उठवला जातो आहे. आतापर्यंत या लढाईत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल ४०पेक्षा जास्त नामवंत अभिनेत्रींनी सहभाग घेतला आहे. या मांदियाळीत आता ‘वंडर वुमन’चेही नाव सामील झाले आहे. ‘वंडर वुमन’फेम गॅल गडॉटने जोपर्यंत अमेरिकन चित्रपट निर्माता ब्रेट रेटनरला चित्रपटातून बाहेर काढले जात नाही तोपर्यंत ‘डीसी’च्या पुढील कोणत्याही सुपरहिरोपटात काम करणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ब्रेट रेटनरविरोधात अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत आणि अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर काम न करण्याची इच्छा गॅल गडॉटने व्यक्त केली. त्यामुळे जोपर्यंत ब्रेटची पुढील चित्रपटांतून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत ‘वंडर वुमन २’च्या चित्रीकरणासाठी हजेरी लावणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच तिने घेतली आहे.

‘वंडर वुमन’ हा ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’चा सध्याचा सर्वात सुपरहिट सिनेमा आहे. या नायिकाप्रधान चित्रपटातील यशात गल गडॉटचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे पुढील काही काळ कोणत्याही परिस्थितीत तिला या सुपरहिरोपटातून बाहेर काढणे योग्य होणार नाही. तसेच निर्माता ब्रेट रेटनरने ‘डीसी’च्या अगामी चित्रपटांवर कोटय़वधींचा खर्च केला आहे. त्यामुळे त्यालाही बाहेर काढणे म्हणजे मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्यासारखे आहे. शिवाय सध्या ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ची अवस्था माव्र्हलच्या तुलनेत फार बिकट असल्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी ‘वंडर वुमन’ ही यशस्वी व्यक्तिरेखा व कोटय़वधींचे अर्थसाहाय्य करणारा ब्रेट या दोघांचीही गरज आहे. या पाश्र्वभूमीवर विचार करता गॅल गडॉटची अट ‘डीसी’ला चांगलीच महागात पडलेली दिसते.