करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. लॉकडाउनमुळे सिनेउद्योग तर पार ठप्पच झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात एकही नवा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परिणामी चित्रपटगृह देखील ओसाड पडली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वंडर वुमन १९८४’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

‘वंडर वुमन १९८४’ हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री गल गडॉट हिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग तयार करण्यात आला. मात्र करोना विषाणूच्या प्रभावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार वंडर वुमन येत्या १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट पाच जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे निर्मात्यांच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले. खरं तर १४ ऑगस्ट ही तारीख देखील पक्की नाही. ‘वंडर वुमन’ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. तो संपूर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जर परिस्थिती नियंत्रणात असेल तरच चित्रपट प्रदर्शित होईल. अन्यथा निर्मात्यांनी पुढच्या वर्षात चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी देखील ठेवली आहे.