चित्रपट, मालिका, फेसबुक, ट्विटर, सॉफ्टवेअर, महत्त्वाची माहिती असलेल्या वेबसाइट या प्रकारची विविध माध्यमे आज इंरनेटवर कार्यरत आहेत. ही सर्वच माध्यमे आज ब्लॅक हॅकर्सच्या जाळ्यात अडकली आहेत. मोठमोठय़ा सुरक्षा यंत्रणा भेदण्यात निपुण असलेल्या या अट्टल गुन्हेगारांनी निर्मात्यांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे. जगातील सर्वात महागडय़ा मालिकांपैकी एक असलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका देखील अशाच गुन्हेगारांच्या जाळ्यात पार खोलवर अडकली आहे. या मालिकेच्या सातव्या सत्रातील सातवा भागही लीक झाल्यामुळे निर्मात्यांना कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. सातत्याने होणाऱ्या या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी निर्माते डेव्हिड बेनिऑफ यांनी जगातील सर्वात उत्कृष्ट सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून चार गुन्हेगारांना पकडले आहे. हे चारही गुन्हेगार भारतीय असून त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एका सॉफ्टवेअर बनवण्याऱ्या कंपनीत काम करणाऱ्या या गुन्हेगारांवर माहिती चोरणे, खंडणी मागणे यांसारख्या विविध सायबर कायद्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी ‘एचबीओ’ वाहिनीचा डेटा सर्वर हॅक करून त्यातील १५० टीबीपेक्षा जास्त माहिती चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींकडून वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड प्लेप्लर यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे एक पत्र आले होते. त्यांनी त्या धमकीला न जुमानता थेट पोलीस तक्रार केली. परिणामी त्या संतप्त गुन्हेगारांनी ‘एचबीओ’ची सर्व माहिती इंटरनेटवर लीक करून टाकली होती. ती माहिती या तिघांनीच चोरली होती असा दावा तज्ज्ञांनी केला असून त्यासंदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.