‘गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकप्रियता जंगलात जसा वणवा पेटावा त्या वेगाने जगभरात पसरली आहे. २०११ साली सुरु झालेल्या या महामालिकेने गेल्या नऊ वर्षात अनेक नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. ‘अवतार’, ‘टायटॅनिक’, ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’, ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ यांसारख्या अनेक भव्यदिव्य हॉलिवूडपटांनाही अवाक् करणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सध्या अखेरचे पर्व सुरु आहे. मात्र, प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या या महामालिकेच्या आठव्या पर्वाबाबत चाहते काहीसे नाराज आहेत. चाहत्यांनी पहिल्या भाग प्रदर्शित झाला तेव्हा पासूनच आपली नाराजी समाजमाध्यामांवर व्यक्त करायला सुरुवात केली होती. पुढे प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक भागागणीक ही नाराजी आणखीनच वाढत गेली. आणि आता तर मालिकेचा शेवटचा भाग अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना चाहत्यांनी आपली नाराजी दर्शवण्यासाठी थेट मालिकेच्या निर्मात्यांकडे म्हणजे एचबीओ या वाहिनीकडे धाव घेतली आहे.

‘डेलेन डी’ नामक एका चाहत्याने गेम ऑफ थ्रोन्सचे लेखक ‘डी. बी. वाईस’ व ‘डेव्हिड बेनिऑफ’ यांच्याविरोधात एचबीओकडे गाऱ्हाणं मांडलं असून त्यांच्या याचिकेवर तब्बल २ लाख १० हजार चाहत्यांनी सही करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका आश्चर्यचकित करणारे कथानक, संवाद व उत्कृष्ट दर्जाचा अभिनय यासाठी ओळखले जाते. परंतु शेवटच्या सत्रात दोन्ही दिग्दर्शकांनी मिळून या मालिकेचा पार सत्यानाश केला अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी आठवे पर्व पुन्हा एकदा नवीन कथानक तयार करून प्रदर्शित करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका लेखक ‘जॉर्ज आर. आर. मार्टीन’ यांच्या ‘द सॉग्स ऑफ आईस अँड फायर’ या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहेत. या मालिकेचे पहिले सात भाग त्या कादंबरीच्या चार भागांवर आधारित होते. परंतु या पुढील कथा पुस्तक रुपात उपलब्ध नसल्यामुळे मालिकेच्या पटकथाकारांनाच पुढील कथानक रचावे लागले. हे कथानक अगदीच सामान्य दर्जाचे असल्यामुळे चाहत्यांना ते फारसे रुचलेले नाही. याबाबत चाहत्यांनी पहिल्या भागापासूनच आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. आता तर चाहते लेखकांविरोधात थेट निर्मात्यांकडे पोहोचले आहेत. गेम ऑफ थ्रोन्सचा अखेरचा भाग येत्या रविवारी प्रदर्शित होणार आहे.