‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत या मालिकेचे सात सीझन प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे या मालिकेच्या आठव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या आठव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये उत्तम पटकथा, अभिनय आणि अ‍ॅनिमेशन असल्यामुळे ही मालिका कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाली. या मालिकेचा ८ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तत्पूर्वी एचओबीने या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला आर्य स्टार्क झळकली असून या ट्रेलरमध्ये गूढ, रहस्य आणि रंजकता या साऱ्याचा समावेश केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमध्ये तीन महत्वपूर्ण पात्र दाखविण्यात आली होती. त्यामुळे या प्रेक्षकांना नव्या सीझनचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे २०१७ मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा ७ वा सिझन प्रदर्शित झाला होता. मात्र २०१८ मध्ये याचा नवा सिझन प्रदर्शित करण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंटा शिगेला पोहोचली होती. आता हा नवा ८ वा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून त्याचा पहिला शो १४ एप्रिल २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे