‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या सातव्या सत्राचा उत्तरार्ध सुरू झाला असून चाहत्यांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. या मालिकेचे जितके चाहते पाश्चात्त्य देशांमध्ये आहेत. तितकेच आशिया खंडामध्ये देखील दिसून येत आहेत. अशाच असंख्य चाहत्यांपैकी एका पाकिस्तानी चाहत्याने इस्लामाबादमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स: किंग्स लँडिंग’ या नावाचे हॉटेल सुरू केले आहे. मालिकेतील सात राज्यांवर राज्य करणारा राजा ‘किंग्स लँडिंग’ या वेस्टेरॉस साम्राज्याच्या राजधानीत वास्तव्य करतो. त्यामुळे ‘किंग्स लँडिंग’ या नावाला एक विशेष वलय प्राप्त झाले आहे. मालिकेतील डॅनेरिस टारगॅरियन, जॉन स्त्रे, टीरियन लॅनिस्टर, सरसी लॅनिस्टर, आर्या स्टार्क, नेड स्टार्क, खाल ड्रेगो, मारगेरी टायरेल, जोरोह मॉरमोंट यांसारख्या अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांच्या चित्रांनी सजवलेल्या या हॉटेलला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दहशदवाद आणि गुन्हेगारीमुळे निराश झालेली पाकिस्तानी जनता एक फँटसीलँड म्हणून या ठिकाणाकडे पाहात आहे. या हॉटेलची रचना अगदी हुबेहूब मालिकेतील हॉटेलप्रमाणेच आहे. यात वापरण्यात आलेले साहित्य लाकडाचे असून त्यांचे डिझाइन जुन्या पद्धतीचे आहे. यात मिळणाऱ्या पदार्थाची नावे मालिकेतील लोकप्रिय कलाकारांच्या नावांवरून ठेवण्यात आली असून वेटर्सचा अवतार आणि पदार्थ आणून देण्याची पद्धत वाईल्ड लिंग्सप्रमाणे आहे. ग्राहक पदार्थाचा आनंद घेताना ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आस्वाद देखील घेऊ शकतील अशी व्यवस्था येथे केली आहे. हॉटेलच्या मालकाच्या मते तो स्वत: या मालिकेचा जबरदस्त चाहता असून त्यांतील कलाकारांप्रति त्याचे असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने या हॉटेलची निर्मिती केली आहे.