19 February 2019

News Flash

गणपती आरती प्रथमच सरोद वाद्यातून संगीतबद्ध

'जय गणेश जय गणेश देवा..' आणि 'सुखकर्ता दुःखहर्ता' या दोन आरत्यांचे सुरमधुर व मनोवेधक असे सरोद इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन शास्त्रीय संगीतकार अमान आणि अयान यांनी प्रस्तुत

अमान अली बंगाश आणि अयान अली बंगाश

सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे पुत्र अमान अली बंगाश आणि अयान अली बंगाश यांनी नुकतंच गणपती बाप्पाच्या आगमनाचे औचित्य साधून सरोद वाद्याद्वारे गणपतीच्या आरत्या संगीतबद्ध केल्या आहेत. ‘जय गणेश जय गणेश देवा..’ आणि ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या दोन आरत्यांचे सुरमधुर व मनोवेधक असे सरोद इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन शास्त्रीय संगीतकार अमान आणि अयान यांनी प्रस्तुत केले आहे.

प्रथमच गणपती आरतीचे सरोद इंस्ट्रुमेंटल व्हर्जन संगीतबद्ध करण्याबाबत अमान अली बंगाश म्हणतात की, ‘गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे. गणपती आरत्यांमधील एक साधेपणा, सादगी आणि प्रेरणा मनाला भावणारी असते. हीच भावना सरोद वाद्याद्वारे टिपायचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या गणपती आरतीच्या सरोद इंस्ट्रुमेंटल व्हर्जनद्वारे केलेला आहे. जय गणेश… पासून सुरुवात करत सुखकर्ता आणि सुंदर अशा गणेश पुरणाचा उपयोग करून पखवाज काम्पोजिशनद्वारे हा ट्रॅक संगीतबद्ध करण्यात आलेला आहे. या संगीतामुळे गणेशोत्सवाप्रसंगी सर्वांना शांतता, सौख्य व समृद्धीची प्रेरणा मिळो हीच देवाचरणी प्रार्थना.’

आधीपासूनच सुप्रसिद्ध व लोकप्रिय असणाऱ्या या आरत्यांना पुन्हा संगीतबद्ध करणे आणि तेही सरोद वाद्याद्वारे हे एक प्रकारचे आव्हानच अमान आणि अयान यांनी स्वीकारले होते. त्याबद्दल सांगताना अयान अली बंगाश म्हणतात की, ‘सरोद वाद्याद्वारे या आरत्यांची पुनरावृत्ती करण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आरत्यांचा हा ट्रॅक वेदांप्रमाणेच दैवीय मार्गाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मला अशी आशा आहे की, हे संगीत देखील प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जाईल.’

First Published on September 11, 2018 11:14 am

Web Title: ganapati aarti first time composed on sarod ganeshotsav special