21 January 2018

News Flash

‘गांधी आडवा येतो’

नाटककार वसंत कानेटकर यांनी वैविध्यपूर्ण नाटकं लिहिली असली तरी प्रेक्षकांना जबर वैचारिक वा सांस्कृतिक धक्का बसेल असं काही लिहिण्याचं त्यांनी कटाक्षानं टाळलेलं दिसतं. प्रेक्षकांचं मनोरंजन

रवींद्र पाथरे | Updated: January 13, 2013 1:06 AM

नाटककार वसंत कानेटकर यांनी वैविध्यपूर्ण नाटकं लिहिली असली तरी प्रेक्षकांना जबर वैचारिक वा सांस्कृतिक धक्का बसेल असं काही लिहिण्याचं त्यांनी कटाक्षानं टाळलेलं दिसतं. प्रेक्षकांचं मनोरंजन होईल आणि त्या ओघात त्यांना पचतील, रुचतील इतपत विषयांची वेगळी मांडणी त्यांच्या नाटकांतून आढळते. तत्कालीन समाजातील एक मोठा वर्ग प्रचलित वास्तवाकडे संपूर्ण डोळेझाक करून भाबडं समाजवास्तव मांडणारी कोल्हटकरी-कालेलकरी सुभाषितवजा बोधप्रद नाटकं डोक्यावर घेत होता. या वर्गाच्या मानसिकतेला फार धक्का पोचणार नाही इतपत बंडखोरी कानेटकरांच्या नाटकांतून असे. त्यामुळे तेही लोकप्रिय ठरले. नाटय़तंत्रावर त्यांची हुकूमत होती. त्यांची नाटकं तंत्रदृष्टय़ा जरी निर्दोष असली तरीही त्यांतून समाजाला आरसा दाखवण्याचं किंवा त्याला खडबडून जागं करण्याचं काम त्यांनी अभावानंच केलं. पण आजच्या काळात कुणी अशी नाटकं लिहू लागला तर लोक त्याला वेडय़ात काढतील. (आज अशी नाटकं लिहिली जातच नाहीत असं नाही. परंतु प्रेक्षक त्यांना फार आश्रय देत नाहीत.) या पाश्र्वभूमीवर नाटककार शफाअत खान यांनी जाणूनबुजून कानेटकरी शैलीत नाटक लिहावं याचं कुणालाही आश्चर्य वाटेल. पण ‘गांधी आडवा येतो’ हे त्यांचं ‘अथर्व’ निर्मित नाटक याच कुळीतलं आहे.
 कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’शी काहीसं नातं सांगणारं हे नाटक. तथापि त्याची मांडणी जरी कानेटकरी असली, तरी त्यात मांडलेलं वास्तव मात्र आजचं आणि अस्सल शफाअत खानी शैलीतलं आहे. व्यक्ती तसंच समाजाच्या उक्ती आणि कृतीतील विरोधाभास, त्यांचं अध:पतन, मूल्यांचा ऱ्हास हा नेहमीच शफाअत खान यांच्या चिंतनाचा व तिरकस लेखनाचा विषय झालेला दिसतो. ‘गांधी आडवा येतो’ या शीर्षकापासूनच याची प्रचीती येते.  
‘अश्रूंची झाली फुले’तल्यासारखाच यातही ‘लाल्या’ नामक एक गुंड आहे. प्रो. विद्यानंदांसारखेच प्रो. बुद्धिसागर आहेत. परिस्थितीच्या रेटय़ानं या दोघांत होणारं टोकाचं परिवर्तन हा दोन्ही नाटकांचा समान विषय! परंतु हे साम्य इथंच संपतं. ‘अश्रू’मधलं परिवर्तन कृत्रिम, न पचणारं अन् न पटणारं होतं. ‘गांधी आडवा येतो’मध्ये लाल्याच्या बाबतीत ते काहीसं न पटणारं असलं तरी प्रो. बुद्धिसागर यांच्या बाबतीत मात्र ते सहज पटावं इतक्या झपाटय़ानं आजचं सामाजिक वास्तव बदललेलं आहे.
स्वत:ला स्वच्छ चारित्र्याचे विचारवंत समजणारे प्रो. बुद्धिसागर यांचं चौकोनी कुटुंब आहे. मुलगी माया नुकतीच डॉक्टर झालेली. श्याम मात्र अजून कुठंच स्थिर न झालेला.. अस्थिर मनोवृत्तीचा तरुण. प्रोफेसरांची बायको संध्या ही टिपिकल गृहिणी. सतत टीव्हीला चिकटलेली. प्रो. बुद्धिसागर आपली विद्यार्थिनी सुजाता या नवोदित कवयित्रीशी अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून सध्या कॉलेजातून निलंबित झालेत. त्यांच्यावरील आरोपासंबंधात चौकशी समिती नेमली गेलीय. त्यामुळे सध्या ते घरी बसलेत. मात्र, आपल्याला यात नाहक गोवलंय, असं त्यांचं म्हणणं आहे.  
अशात माया लाल्या या गुंडाशी लग्न करून त्याला नवरा म्हणून आपल्या घरी आणते. लाल्याची झोपडी टॉवर बांधण्याकरता पाडली गेलीय. त्यामुळे काही काळ तो आपल्याकडेच राहील, असं माया सर्वाना सांगते. मायाच्या या गौप्यस्फोटानं प्रोफेसरांच्या घरावर वीज कोसळते. एका गुंडाला जावई म्हणून घरात घेण्यापेक्षा संध्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देते. स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे प्रो. बुद्धिसागरसुद्धा मायानं दिलेल्या या दणक्यानं किंचित काळ दिग्मुढ होतात. ‘लाल्या आता सुधारतोय, त्यानं गुंडगिरी सोडलीय,’ असं माया त्यांना सांगते. तो सध्या (नाटककार) चेऊलकरांच्या सांगण्यावरून ‘गांधी’ वाचू लागलाय. त्यामुळे त्याच्या आचार-विचारांत बदल होऊ लागलेत. त्याची भाषा सुधारलीय. तोही सुधारू बघतोय, असं ती परोपरीनं सांगते.
दरम्यान, प्रोफेसरांना सुजाता प्रकरणी फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला लाल्याने ‘उभा चिरीन’ असं म्हणताच बुद्धिसागरांना लाल्याची ‘उपयुक्तता’ लक्षात येते. ते त्याला ताबडतोब जावई म्हणून मान्यता देतात. आपल्यावर शेकलेल्या ‘प्रकरणा’तून सुटका करून घ्यायला लाल्या कामाचा आहे, हे त्यांच्या ध्यानी येतं. ते संध्याची समजूत काढतात. उभयता लाल्याला जावई म्हणून स्वीकारतात.
लाल्या ‘आपल्या’ पद्धतीनं प्रो. बुद्धिसागरांवरील ‘किटाळ’ दूर करतो. चौकशी समिती त्यांना निर्दोष घोषित करते. सुजाताही त्यांच्यावरील आरोप मागे घेते. लाल्याची उपयुक्तता जाणून प्रो. बुद्धिसागर यांचा एक बिल्डर शिष्य चुणिलाल त्यांना कन्स्ट्रक्शन लाइनमध्ये येण्याची ऑफर देतो. पैसे कमावण्याची चालून आलेली ही संधी प्रो. बुद्धिसागर दवडणे शक्यच नसतं. लाल्याला हाताशी धरून झोपडय़ा हटवायच्या आणि तिथं टॉवर बांधायची त्याची योजना असते. लाल्यामुळे अकस्मात प्रो. बुद्धिसागरांना बरकत येते. ते कॉलेजच्या नोकरीचा राजीनामा देतात. बिल्डर बनतात.
पण लाल्याला हाताशी धरून झोपडय़ा उठवायची त्यांची योजना फसते. वस्तीवाल्यांना वाऱ्यावर सोडून देण्याच्या त्यांच्या योजनेस तसंच झोपडीवाल्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या गणपत शेट्टीचा काटा काढण्यास लाल्या साफ नकार देतो. त्यामुळे चुणिलाल आणि प्रोफेसर दोघंही गोत्यात येतात.
भरीस भर श्यामचा डॉलीनं केलेला प्रेमभंग, त्यातून त्याला आलेलं डिप्रेशन, प्रियाचं त्याच्यावरचं एकतर्फी प्रेम, नैराश्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्या डीसीपी वडिलांच्या साहाय्यानं तिनं डॉलीचा प्रियकर फिरोज याला मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणात अडकवणं, श्यामला सूड उगवल्याचं समाधान मिळाल्यावर त्यानं पुन्हा डॉलीशी गुटर्गु करणं, तशात वडील बिल्डर झाल्याने त्याला आलेलं माजोर्डेपण, त्यानं प्रियाला थुकपट्टी लावणं, त्याच्या या एहसानफरोशीनं संतापलेल्या प्रियानं त्याचा नक्षा उतरवायचा केलेला निर्धार, श्यामला शेवटी गुडघे टेकवून लग्न करायला भाग पाडणं.. असं एक समांतर उपकथानकही नाटकाला आहे. या प्रकरणातही लाल्याच्याच खांद्यावर बंदुक ठेवून सगळी लढाई लढली जाते.
तशात ज्या चेऊलकरांमुळे लाल्या सुधारतो, त्यांच्या नव्या नाटकावरून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यास प्रो. बुद्धिसागर लाल्याला भाग पाडतात.
या घडामोडींचा आणि त्यात आपल्याला नाहक वापरलं जातंय, या जाणिवेनं लाल्याला त्रास होऊ लागतो. सुधारू बघणाऱ्या, ‘गांधी’ बनू पाहणाऱ्या लाल्याच्या भेजाचा पार गोविंदा होतो. आणि आता हा बदललेला लाल्या आपल्या कामाचा नाही, हे लक्षात येताच त्याचाच एन्काऊंटर करण्याचं प्रोफेसर आणि श्याम ठरवतात..
लेखक शफाअत खान यांनी आजच्या परिस्थितीवर तिरकस भाष्य करणारं हे नाटक उपरोध, उपहास आणि अतिशयोक्ती या विनोदास्त्रांचा वापर करत लीलया रचलं आहे. नाटकाची रचना कानेटकरी असली तरी त्याची हाताळणी मात्र खास शफाअत खानी आहे. म्हणजे वरकरणी अतक्र्य वाटणारी पात्रं, त्यांची कृत्रिम भाषा, कृतक वागणं, त्यांचे अवास्तव वाटावेत असे जगण्याचे संदर्भ आणि दुसरीकडे त्यांना उघडेनागडे करण्याची एकही संधी न सोडण्याचा शफाअत खानी रचलेला सापळा- असा हा दुहेरी पेच आहे.
अस्वल जसं माणसाला गुदगुल्या करत मारतं, तसं हे नाटक हसता-हसवता प्रेक्षकाचं वस्त्रहरण करतं. वरपांगी थिल्लर वाटणारे विनोद प्रत्यक्षात अत्यंत धारदार जखमा करतात. नाटकातील जुन्या वळणाची सुभाषितवजा वाक्यं आजच्या वास्तवावर तीक्ष्ण वार करतात. ‘माझा खून म्हणजे मूल्यांचा, आदर्शाचा खून!’ हे प्रोफेसरांच्या तोंडचं वाक्य त्यांचं पोकळपण अधोरेखित करतं. श्यामच्या उपकथानकातून लेखकानं माणसं व्यक्तिवादाच्या अतिरेकाने कुठल्या टोकाला जाऊ शकतात, हे दाखवून दिलं आहे. लेखकानं प्रत्येक प्रवेशाची सुरुवात टीव्हीवरच्या बातम्यांनी केली आहे. बाहेरचं वास्तव दाखवण्यासाठी वापरलेला हा डिव्हाइस चपखल आहे. त्याचबरोबर पात्रांच्या तोंडून लेखक अधूनमधून आजच्या समाजस्थितीवर, माणसांवर चांगलेच कोरडे ओढतो.
दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी लेखकाची तिरकस शैली आणि कानेटकरी बाजाचं नाटकाचं वळण यांचा तोल नेमकेपणानं सांभाळला आहे. पात्रांच्या उक्ती आणि कृतीतला विरोधाभास अधिक जोरकसपणे कसा बाहेर काढता येईल, हे त्यांनी पाहिलं आहे. फक्त नाटकाच्या शेवटी एन्काऊंटरमध्ये लाल्या मारला गेल्याचं सांगितलं जात असताना आणि त्याच्या शोकसभेची तयारी केली जात असताना अचानकपणे त्याचं प्रकटणं प्रेक्षकांना धक्का देऊन जातं. त्यातला संभ्रम दूर करायला हवा. प्रत्येक पात्राचा एक निश्चित असा प्रवास दिग्दर्शकानं ठळक केला आहे. पण हे करताना त्यातली नाटय़पूर्णता हरवणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. सुरुवातीला श्यामचं कोंडलेपण आणि त्याची डोकेदुखी उत्तरार्धात लाल्याला ग्रासते. यातून मूल्यांचा ऱ्हास अधोरेखित होतो. भावविवशतेला फाटा देऊन सबंध नाटक माणसांचा अस्सल चेहरा दाखविण्यावर भर देतं.
प्रदीप मुळ्ये यांनी उभारलेलं प्रोफेसरांचं आल्हाददायी, कलात्मक अभिरुचीचं घर अप्रतिम! भूषण देसाईंनी प्रकाशयोजनेद्वारे घटना-प्रसंगांतील नाटय़ अधिक उठावदार केलं आहे. अमोल संकुळकरांचं पाश्र्वसंगीत नाटकातील उपहासाचं सूर कायम राखतं. महेश शेरला यांची वेशभूषा आणि संदीप नगरकर- प्रदीप दर्णे यांची रंगभूषा पात्रांचे ‘खरे’ चेहरे रेखते.
लाल्या झालेल्या उमेश कामत यांनी ‘लव्हेबल रास्कल’ या संज्ञेस जागत लाल्याचं संक्रमण उत्कटतेनं साकारलं आहे. प्रारंभी बेफिकीर, कुणाचीही भीडमुर्वत न बाळगणारा लाल्या उत्तरार्धात मात्र कोंडीत सापडून स्वत:शीच झगडत राहतो, मूल्यांच्या संघर्षांत पार हतबल होतो, हे स्थित्यंतर त्यांनी अवघ्या देहबोलीतून व्यक्त केलंय. मिलिंद फाटक यांनी प्रो. बुद्धिसागर यांचं बेगडी पुरोगामित्व, त्यांची दांभिकता आणि उत्तरार्धात सर्वार्थानं झालेली त्यांची अवनती भाषेतील बदलासह उत्तमरीत्या दाखवलीय. चिन्मय केळकर यांनी श्यामच्या विविध मनोवस्था त्यातल्या सूक्ष्म तपशिलांसह आविष्कारित केल्या आहेत.
प्रिया हे पात्र काही क्षणी लेखकाचं वाटतं, तर काही वेळा स्वत:चं. मोनिका दबडे यांनी तिचं लोभस तितकंच खमकं व्यक्तिमत्त्व मुद्राभिनय आणि संवादोच्चारांतून सशक्तपणे पेललंय.
शैला काणेकर यांनी सुरुवातीचं संध्याचं पोकळ वागणं-बोलणं आणि नंतरचं नॉर्मल वर्तन यथार्थपणे दाखवलंय. माधुरी भारती यांना मायाच्या भूमिकेत फारसा वाव नव्हताच. आजच्या वास्तवाचा नग्न चेहरा दाखवणारं आणि तरीही मस्त मनोरंजन करणारं हे नाटक प्रत्येकानं एकदा तरी नक्की पाहायला हवं.

First Published on January 13, 2013 1:06 am

Web Title: gandhi coming in cross
  1. No Comments.