राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती आहे. राजकीय नेत्यांपासून विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी गांधीजींना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. दरम्यान भारताच्या गाणगोकीळा लता मंगेशकर यांनी देखील आपल्या अनोख्या शैलीत गांधीजींना प्रणाम केला. त्यांनी महात्मा गांधींचं आवडतं ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे’ या भजनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात स्वत: लता मंगेशकर यांनी हे भजन गायलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी संपूर्ण देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

महात्मा गांधी हे नाव घेतले की, भारतीय स्वातंत्र्यलढा डोळ्यासमोर येत असला तरी गांधी फक्त स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते. गांधींनी समाजात विचारांचा पायाही रचला. सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देत सत्याग्रहाच्या मार्गाने समाजाला संघटित केले. जनभावनेचा आदर राखून आपले विचार मांडण्याच्या गांधींच्या वृत्तीनेच हे शक्य झाले. सत्य, अहिंसा आणि प्रेम याद्वारे पुढे जाणारा समाजच अधिक प्रगत समाज असू शकतो हे त्यांचे मत होते. गांधी भारतात रामराज्याची कल्पना करत होते. पण त्यांची रामराज्याची कल्पना वेगळी होती. जातीभेद, धर्म, स्वराज्य आणि रामराज्य प्रस्थापित करण्यातील अडथळा आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. गांधी धर्मांध राजकारणाला समाजात पसरणारे विष समजत.