09 March 2021

News Flash

‘गणपतीची ५० रुपं कशी असू शकतील?’

मंडळांमध्ये आपला वैयक्तिक हेतू साध्य व्हावा म्हणून स्वंयघोषित नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं.

अभिजीत खांडकेकर

मी लहान असल्यापासूनचं दरवर्षी आमच्या घरी दहा दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात. बाबांची कामानिमित्त सतत बदली होत राहायची. त्यामुळे नगर, बीड, परभणी अशा अनेक ठिकाणी आम्हाला जावं लागायचं. पण तरीसुद्धा दरवर्षी गणपती आणण्याची प्रथा कायम आहे.
गेल्याचवर्षी मी मुंबईत घर घेतलं. मी आणि सुखदा मुंबईत राहतो तर आई-बाबा नाशिकच्या घरी राहतात. तिथेच आम्ही गणपतीचा सण साजरा करतो. मात्र, गौरी माझ्या काकांच्या घरी आणली जाते. मी आणि सुखदा न चुकता गणपतीसाठी नाशिकला जातो. असं क्वचितच घडलं असेल की मी गणपतीला घरी नसेन. यावर्षी मी मालिकेच्या कामामुळे व्यस्त आहे. मात्र, तरीही काही दिवसांसाठी मी नाशिकला जाऊन येईन. बाप्पाच्या मूर्तीबाबत आम्ही नेहमी काही नियम पाळतो. आम्ही शक्यतो पारंपारिक मूर्तीला प्राधान्य देतो. बाप्पाचं पितांबर, डोळे पडताळल्यानंतर मूर्तीची निवड केली जाते. अगदी साधी पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भावेल अशी मोहक, पिंतांबर नेसलेली आणि आसनस्थ मूर्ती आम्ही आणतो. प्रसन्न अशी गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या घरी १० दिवसांसाठी विराजमान होते. सजावटीचं म्हणाल तर लहानपणी मी, माझी मोठी बहिण आणि आई-बाबा मिळून जशी जमेल तशी सजावट करायचो. मोठ्या बहिणीला कलाकुसरीची खूप आवड असल्यामुळे तिचा यात जास्त हातभार असायचा. आता आम्ही दोघंही नाशिकला नसल्यामुळे साधी सजावट केली जाते. फुलांची आरास आणि भरजरी साड्यांचा वापर करून सोपी आरास आम्ही बाप्पासाठी करतो. बाप्पाची आरास करताना मला दिखावा आवडत नाही. मुळात घरात आणला जाणारा बाप्पा हा काही सार्वजनिक मंडळातला बाप्पा नाही. उगाचचं दिखाव्यासाठी काही तरी मोठी सजावट करणं हे मला अजिबात पटत नाही.
आता ब-याच ठिकाणी मंडळांमध्ये सजावटीवरून किंवा मूर्तीच्या उंचीवरून स्पर्धा पाहायला मिळते. हा नवसाला पावणारा बाप्पा.. अशी प्रसिद्धीही केली जाते. पण गणपतीची ५० रुपं कशी असू शकतील? बाप्पा हा एकच आहे. हा नवसाला पावणारा आणि हा न पावणारा असे वर्णन तुम्ही करूच कसे शकता. अनेक मंडळांमध्ये आपला वैयक्तिक हेतू साध्य व्हावा म्हणून स्वंयघोषित नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं. ते चुकीचच आहे. त्यामुळे मी शक्यतो कोणत्याही मंडळाच्या गणपतीला जाणं टाळतो.
शब्दांकन- चैताली गुरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 10:01 am

Web Title: ganesh festival celebration by actor abhijeet khandkekar
Next Stories
1 ‘बांदेकरांना गलेलठ्ठ आणि पोटावर नाग असलेला बाप्पा आवडतो’
2 दिग्गज क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या देवाच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन
3 ‘बाप्पासाठी कोकणातला जुना मोठा वाडा उघडला जातो’
Just Now!
X