शशांक केतकर

आमच्याकडे गेली तीस वर्ष गणपती येतोयं. माझ्या काकांच्या घरी ठाण्याला बाप्पाची प्रतिष्ठापणा केली जाते. गेली दहा वर्ष आमच्याकडे बाप्पासाठी पर्यावरणस्नेही सजावट केली जाते. फुलांची आरास यापलीकडे कोणतीही सजावट केली जात नाही. कामामुळे सगळेचजण आता व्यस्त राहू लागले आहेत. बाप्पाच्या निमित्ताने संपूर्ण केतकर कुटुंब एकत्र येतं. सर्वांना भेटण्याची संधी मिळते. यावेळी घरात खूप आनंदी वातावरण असतं. आमच्याकडे एक वेगळीच प्रथा आहे. बाप्पाचं विसर्जन झालं की आमच्याकडे मिसळ पावचा कार्यक्रम असतो. संपूर्ण केतकर कुटुंब एकत्र बसून मिसळ पाववर ताव मारतो. ठाण्यामध्ये मिसळ पावची दोन-तीन प्रसिद्ध ठिकाणं आहेत तिथून मिसळ आणली जाते.
माझा गणपतीवर विश्वास आहे. पण मी फार देव देव करणारा व्यक्ती नाही. मी देवापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. जे काही चूक असेल किंवा बरोबर असेल ते मी करतो. आपण केलेल्या चूकीसाठी देवाला का दोष द्यायचा. मी नुकत्याच सैराटनुसार बनवलेल्या मूर्ती, आंदोलनाला बसलेले बाप्पा, जय मल्हार, बाजीराव यांसारख्या अनेक मूर्ती पाहिल्या. हे पाहिल्यानंतर मला शंका येते की त्याचं नेमकं रुप काय दाखवायचं. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत. आपण देवाला कधी पाहिलेलं नाही. कुठला देव कोणाचा हे आपण ठरवलंय. लोकांना का कळत नाही की ही एक मातीची मूर्ती आहे त्याचं कौतुक आणि लाड करू तितकं कमी आहे. श्रद्धा महत्त्वाची आहे. हल्ली आपल्या आवडीनुसार सण साजरा केला जातो. काही अंतरावरचं बाप्पाचे मंडप दिसतात. केवळ स्पर्धेपोटी मोठमोठी मंडप बांधून १०-१५ दिवस रस्ते अडवले जातात. त्यामुळे लोकांची तारांबळ उडते आणि वाहतूक कोंडीही होते. या सगळ्यामुळेच त्याच्यावरच प्रेम कुठेतरी कमी होतं. हे सगळं थांबावायला हवं. त्यासाठी सरकारने शहरातली पाच मैदानं मंडळांना अलॉट करून द्यायला हवी. तुम्हाला इथे जे काही मंडप टाकायचय, मोठी सजावट करायचीय ते करा. पण जे काही होईल ते या जागेतच होईल. यामुळे सर्व गोष्टींवर नियंत्रण येईल. सणाचा आनंद कायम राहिल आणि लोकांच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही.
बाप्पाचं आगमन झालंय आणि काही दिवसांतच माझा पहिला चित्रपट वन वे तिकीट प्रदर्शित होईल. स्वाभाविकचं पहिला चित्रपट येतोय त्यामुळे थोडं दडपण आहे. पण माझ्या चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा माझ्या पाठिशी आहे. चांगल काम करत राहणं हे माझ्या हातात आहे, ते मी सतत करत राहिन. मी कधीच पैशामागे धावत नाही. कमी काम करावं पण चांगल काम करावं असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कमी कमवेन पण चांगलं काम करेन असा माझा नेहमीच प्रयत्न राहिल.

शब्दांकन- चैताली गुरव